जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आणि पठाणकोट हल्ल्याचा सूत्रधार मसूद अझहरवर बंदी घालण्यासाठी ठोस पुरावे द्यावे अशी भूमिका चीनने मांडली आहे. आम्ही निष्पक्ष भूमिका घेतली असून ठोस पुरावे दिल्यास आम्ही भारताला पाठिंबा देऊ असे चीनने म्हटले आहे.

पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैश – ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरवर बंदी घालण्यात यावी यासाठी भारताने संयुक्त राष्ट्रात प्रयत्न सुरु केले आहेत. विशेष म्हणजे भारताच्या प्रस्तावाला अमेरिकेचीही साथ मिळाली आहे. मात्र यानंतरही चीनने आडकाठी कायम ठेवली आहे. २२ फेब्रुवारीपासून भारत आणि चीनच्या परराष्ट्र सचिवांमध्ये चर्चेला सुरुवात होत असतानाही चीनने मसूद अझहरला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला आहे.

भारत आणि चीनमधील चर्चेत जागतिक पातळीवरील सद्यस्थिती, प्रादेशिक आणि जागतिक पातळीवर दोन्ही देशांमधील हितसंबंध अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. मसूद अझहर आणि आण्विक पुरवठादार गटात भारताचा प्रवेश यावरुन दोन्ही देशांमध्ये मतभेद आहे. यावर चीनची भूमिका काय असा प्रश्न शुक्रवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना विचारण्यात आला. ‘दोन्ही देशांमधील मतभेद हे नैसर्गिक आहे. आम्ही निष्पक्ष भूमिका घेतली असून मसूद अझहरविरोधात ठोस पुरावे दिल्यास आम्ही पाठिंबा देऊ’ असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. आमच्यासाठी ठोस पुरावे हा एकच निकष आहे. जर ठोस पुरावे असतील तर अर्जाला मंजुरी मिळू शकते. पण पुरावेच नसतील तर मग मंजुरी मिळू शकत नाही असे चीनने नमूद केले.

मसूद अझहर याला दहशतवादी घोषित करावे असा भारताचा प्रस्ताव आहे. भारताने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीला मार्च २०१६ मध्ये अर्ज दिला आहे. भारताचा अर्ज चीनने तांत्रिक मुद्द्याच्या आधारे रोखून ठेवला होता. भारताने मांडलेला मुद्दा संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या आवश्यकतांची पूर्तता करत नसल्याचे चीनने म्हटले होते. सुरक्षा परिषदेत १५ देश असून यात फक्त चीनकडून भारताच्या प्रस्तावात आडकाठी आणली जात आहे.