‘‘लहानसान कारणांमुळे आणि स्थानिक घटनांमुळे देशाच्या धार्मिक ऐक्याला बाधा आणता कामा नये. आपल्या देशाचे धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व दुर्बल होऊ नये यासाठी जनतेने दक्ष असले पाहिजे,’’ असे मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय वक्त विकास महामंडळाचे उद्घाटन बुधवारी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत झाले. त्यावेळी सोनियांनी काँग्रेस पक्षाची ओळख धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचे सांगत या तत्त्वाचे पालन होणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
धार्मिक हिंसाचारविरोधी विधेयक लवकरच संसदेत मांडण्यात येणार आहे. सामाजिक सलोखा राखण्यात आणि राष्ट्राचा धर्मनिरपेक्ष वारसा पुढे नेण्यात हे विधेयक मदत करेल, अशी माहितीही त्यांनी दिली. अल्पसख्याकांना समान संधी देणे आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.

अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी ‘वक्फ’चा उपयोग -पंतप्रधान
वक्फ बोर्डाच्या मालमत्तेचा उपयोग अल्पसंख्याकांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी करता येईल, असे मत पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. वक्फ बोर्डाच्या मालकीच्या जमिनीवर शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये उभारण्याच्या पारदर्शी प्रक्रियेत या मंडळाचे मोठे योगदार राहील, असेही त्यांनी सांगितले. अल्पसंख्याकांच्या विकासासाठी नेमण्यात आलेल्या सच्चर समितीच्या शिफारशीनुसार या मंडळाची स्थापना करण्यात आली. सच्चर समितीच्या बहुसंख्य शिफारशी केंद्र सरकारने स्वीकारल्या असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कार्यक्रमात गोंधळ
या कार्यक्रमाच्या वेळी एका व्यक्तीने गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत अल्पसंख्याकांसाठीच्या योजना कागदावरच राहतात त्यांची अंमलबजावणी होत नाही अशी जाहीर तक्रार केली. सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन सभागृहाच्या बाहेर काढले. फाहेम बेग असे या व्यक्तीचे नाव होते व तो डॉक्टर
आहे.