चीन वेगाने आपल्या लष्करी सामर्थ्याचा विस्तार करत आहे. खासकरुन हिंदी महासागरात आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय सैन्यदलांनी त्यांना उत्तर देण्याची आवश्यकता आहे असे मत नौदल प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह यांनी गुरुवारी व्यक्त केले. ‘नव्या युगातील चीनची राष्ट्रीय सुरक्षा’ यावर चीनने एक श्वेतपेपर जारी केला आहे. त्यानंतर करमबीर सिंह यांनी आपल्याला चीनवर बारीक लक्ष ठेवण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.
इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील अमेरिकेच्या हस्तक्षेपावर या श्वेतपत्रामधून जोरदार टीका करण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवर शांतता आणि स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न आहे एवढाच भारताबद्दल उल्लेख आहे. आफ्रिकेत डिजीबाऊटी येथे चीनने आपला परदेशातील पहिला लष्करी तळ उभारला आहे. हिंदी महासागरात चिनी नौदलाचा वावर वाढत असून त्यांच्या युद्धनौका इथे तैनात असतात या धोक्यांकडे करमबीर सिंह यांनी लक्ष वेधले.
चीनच्या हालचालींकडे आपल्याला बारीक लक्ष देण्याची गरज असून आपल्या मर्यादेत राहून चीनला कसे उत्तर देता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे असे नौदल प्रमुख म्हणाले. नौदलाकडे आता १४० युद्धनौका आणि २२० विमाने आहेत. पण यातील बहुतांश युद्धनौका, विमाने निवृत्तीच्या मार्गावर आहेत. निधीचा योग्य पुरवठा झाला तर २०३० पर्यंत भारताकडे २१२ युद्धनौका आणि ४५८ विमाने असतील.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 26, 2019 11:07 am