इंडोनेशियात एका तरुणावर नीडलफिशने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. मोहम्मद इदूल असं या तरुणाचं नाव असून तो आपल्या वडिलांसोबत मासेमारी करण्यासाठी गेला होता. यावेळी नीडलफिशने पाण्याबाहेर उड्या मारण्यास सुरुवात केली. यामधील एका नीडलफिशने मोहम्मद इदूलवर हल्ला केला. या हल्ल्यात माशाने आपलं टोकदार तोंड मोहम्मह इदूलच्या गळ्यात घुसवलं. हल्ला इतका जबरदस्त होता की, माशाचं तोंड त्याच्या गळ्याच्या आरपार गेलं.

जखमी अवस्थेत मोहम्मद इदूलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर दोन तास सर्जरी करण्यात आली. पाच डॉक्टरांच्या टीमने ही सर्जरी करत माशाचं तोडं गळ्यापासून वेगळं केलं. सर्जरी अत्यंत कठीण होती. पण सुदैवाने मासा अशा स्थितीत अडकला होता, ज्यामुळे रक्तस्त्राव झाला नाही अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

मोहम्मद इदूलची प्रकृती सुधारत आहे, मात्र संसर्ग होण्याच्या भीतीने त्याला डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आलं आहे. रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, “रुग्णाची प्रकृती स्थिर आहे, मात्र त्याला ताप आहे. त्याचा ताप कमी होण्याची वाट आम्ही पाहत आहोत. ताप वाढणार नाही अशी आशा आहे”.

नीडलफिश माशाला त्याच्या टोकदार तोंडासाठी ओळखलं जातं. त्याचे दातही धारदार असतात. दाताच्या सहाय्याने ते मोठ्या जखमा करु शकतात. दरम्यान सोशल मीडियावर फोटो व्हायरल होत आहेत.