सर्वोच्च न्यायालयाने गुरूवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षेसंदर्भात (NEET) सीबीएसई बोर्डाला महत्त्वपूर्ण आदेश दिले. त्यानुसार आता २०१८ पासून नीट परीक्षेच्या इंग्रजी, हिंदी आणि अन्य भाषांतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असतील. नीट परीक्षेच्या भाषेनुसार बदलणाऱ्या काठिण्यपातळीवर आक्षेप घेत काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने ‘नीट’च्या पुढील परीक्षेसाठी कोणत्या निकषांच्याआधारे प्रश्नपत्रिका तयार करण्यात येणार, असा सवालही सीबीएसईला विचारला. तसेच यासंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करून माहिती द्यावी, असे आदेशही दिले.

गेल्या महिन्यात काही विद्यार्थ्यांनी इंग्रजी आणि हिंदी भाषेच्या तुलनेत इतर भाषांतील प्रश्नपत्रिका अवघड असतात, असा आक्षेप नोंदवला होता. त्यामुळे ७ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली होती.मात्र, सीबीएसईकडून गेल्याच सुनावणीच्यावेळी हा दावा फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने इतर भाषांमध्ये नीटची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती सीबीएसईकडून मागवली होती. त्यानुसार आज सीबीएसईने कोर्टापुढे माहिती सादर केली. यामध्ये नमूद केल्याप्रमाणे २०१७ साली १,००,१५२ विद्यार्थ्यांनी प्रादेशिक भाषांमध्ये नीटची परीक्षा दिली होती. यापैकी ३०, ८१७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. मात्र, केवळ एकाच विद्यार्थ्याला ७०० गुणांच्या परीक्षेत ६०० पेक्षा जास्त मार्क मिळवता आले होते.

तर दुसरीकडे सीबीएसईकडून सर्व भाषांतील प्रश्नपत्रिकांची काठिण्यपातळी एकच असल्याचा दावा करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या ११.५८ लाख विद्यार्थ्यांपैकी केवळ १.२ लाख जणांनीच प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा दिल्याचे सीबीएसईने सांगितले. त्यानंतर कोर्टाने सर्व भाषांतील प्रश्नपत्रिका एकसारख्याच असावे, असे आदेश सीबीएसईला दिले. मात्र, ७ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याची याचिकाकर्त्यांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली.