पाकिस्तानशी वाटाघाटी करताना आपल्या सामर्थ्याचा विचार करा. उगाच भावनिक होऊ नका, असा सल्ला गुरूवारी काँग्रेसकडून मोदी सरकारला देण्यात आला. लोकसभेत गुरूवारी प्रश्नोत्तरांच्या तासापूर्वी पठाणकोट हल्ल्यासंदर्भात बोलण्यास लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसच्या ज्योतिरादित्य शिंदे यांना परवानगी दिली. फक्त हा मुद्दा उपस्थित करताना राजकारण न करण्याची अट घातली.
शिंदे यांनी पठाणकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी भारत आलेल्या पाकिस्तानी पथकात आयएसआयचा अधिकारी असल्याचा उल्लेख केला. याशिवाय, पठाणकोट हल्ला हा भारताने रचलेला बनाव असल्याच्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांतील बातम्यांचा दाखला देत पाकिस्तानशी नेहमी आपण सामर्थ्यवान देश असल्याच्या भूमिकेतूनच बोलणी केली पाहिजेत, भावनेला अजिबात थारा देऊ नये, असे ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले. शिंदे यांच्या भाषणावरून संतप्त झालेले संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी शिंदे यांचे वक्तव्य लोकसभेच्या कामकाजातून वगळण्याची मागणी केली. त्यांचे वक्तव्य सरकारविरोधी असल्याचे व्यंकय्या नायडू म्हणाले. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून विरोध होत असतानाही ज्योतिरादित्य शिंदे बोलतच राहिले. त्यावेळी लोकसभा अध्यक्षांनी शिंदे यांना उद्देशून म्हटले की, तुम्ही कधीच सूचना ऐकत नाही, म्हणून मी तुम्हाला बोलण्याची परवानगी देत नाही.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 28, 2016 2:59 pm