अमेरिकेतील स्टार्टअप उद्योगाची वेगळी कहाणी
लहानपणी ज्या बाहुल्या मुली वापरत असतात त्यातून त्यांचे काही समज दृढ होत असतात. ते लक्षात घेऊन बार्बी डॉलमध्ये विविध रंगांच्या व फॅशनच्या बाहुल्या आल्या आहेत, तसेच आता हार्वर्ड विद्यापीठातील अमेरिकी-भारतीय पदवीधर विद्यार्थिनी नेहा चौहान वूडवर्ड हिने स्टार्ट अप उद्योगाच्या माध्यमातून बाहुल्यांची नवीन मालिका आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या नवीन प्रकारच्या बाहुल्यांमधून वांशिक विविधता, त्यांची बुद्धिमत्ता व नेतृत्वगुण यावर भर दिला आहे. एकूण सात प्रकारच्या या बाहुल्या असून, त्यात मुली त्यांना आवडणाऱ्या बाहुलीशी त्यांचे नाते जोडू शकतात. या प्रत्येक बाहुलीला व्यक्तिमत्त्व आहे व ते वेगळे आहे.
अवघे २९ वय असलेल्या नेहाने विलोब्रुक गर्ल्स ही खेळण्यांची कंपनी स्टार्टअप म्हणून सुरू केली. विलोब्रुक रोड या भागात नेहा राहात होती त्या वेळी बालपणी तिने जे पाहिले ते तिने मोठेपणी या बाहुल्यांच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणले आहे. जी खेळणी मी खेळले त्याचा माझ्यावर परिणाम झाला, पण त्याचे प्रतिबिंब माझ्यात उमटले नाही व मैत्रिणींवरही काही परिणाम झाला नाही, कारण प्रत्येकाची पाश्र्वभूमी वेगळी होती. त्यामुळे बाहुल्यांमध्ये काहीतरी बदल केले पाहिजेत असे मला वाटत होते, असे सध्या मॅनहटनला राहणारी नेहा सांगते. स्टॅनफर्डला एमबीए करीत असताना तिला बाहुल्यांची कल्पना सुचली व तिचा तिने हार्वर्डमध्ये अर्थशास्त्र शिकताना पाठपुरावा केला. नंतर ती गुंतवणूक सल्लागार म्हणून जेपीमॉर्गनमध्ये काम करीत होती. एका कॉफी शॉपमध्ये ती जात असे त्याच्याजवळच एक बाहुल्यांचे लोकप्रिय दुकान होते. त्यामुळेही नेहाला आणखी प्रेरणा मिळाली. आमच्या कंपनीने ज्या बाहुल्या तयार केल्या आहेत त्यात मुलींना सक्षम करण्याचा हेतू आहे, असे नेहा सांगते. तिने ब्लू अ‍ॅप्रन, डायपर्स डॉट कॉम या ई कॉमर्स संकेतस्थळांसाठी आधी काम केले आहे. त्याचाही फायदा तिला या स्टार्टअपमध्ये झाला आहे. आधुनिक मुलींना खिळवून ठेवेल अशा बाहुल्या सध्या नाहीत. वैद्यकीय शोध, उद्योगधुरीण, अ‍ॅप निर्मात्या व धोरणकर्त्यां अशा भूमिकांत बाहुल्या असल्या पाहिजेत असे नेहाचे मत आहे. मुली जेव्हा अशा भूमिकांतील बाहुल्या बघतील तेव्हा प्रत्यक्ष जीवनात त्या तसे बनण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला काही बनायचे असेल तर ते नेमके काय असते हे माहिती हवे, ते या बाहुल्यांच्या माध्यमातून मुलींच्या समोर ठेवले जात आहे. विलोब्रुकच्या बाहुल्या उद्योग सुरू करणाऱ्या आहेत, त्यांच्या संदर्भातील गोष्टी या वेगळय़ा आहेत. भारतीय अमेरिकी मुलगी म्हणून नेहा वाढली तेव्हा बाहुल्यांमध्ये विविधता हवी असे तिला वाटले. अनेक मुलींशी नेहा बोलली. त्यांनी तिला हेच सांगितले, की आमच्यासारख्या दिसणाऱ्या बाहुल्या आम्हाला हव्यात. त्यांच्याशी आम्हाला नाते जोडता आले पाहिजे. आयुष्यात जसे बनावेसे वाटते त्या भूमिकेतील बाहुल्या हव्यात. विलोब्रुकच्या गर्ल्सच्या बाहुल्या अजून विक्रीस आलेल्या नाहीत, पण त्याआधी नेहाने किकस्टार्टर कॅम्पेन सुरू केले आहे. तिची पहिली बाहुली कॅरा ही अर्धी लॅटिन आहे. तिचे डोळे तपकिरी रंगाचे, केस लांबसडक आहेत. तिच्या निर्मितीसाठी नेहाने पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली आहे. त्यानंतर कॅराची ऑनलाइन विक्री सुरू होईल. नेहाच्या मते विक्री व इतर साधनांतून बाहुल्यांची आणखी निर्मिती करता येईल.