भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पाकिस्तानविरोधात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडे मदत मागितली होती, असा दावा भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही काळातच जेव्हा पाकिस्तानने जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडे मदत मागितली होती, असे त्यांनी म्हटले. गेल्या दोन दिवसांपासून संघप्रमुख मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा दावा केला. परंतु, पत्रकारांनी भागवतांच्या वक्तव्याविषयी प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर थेट मत व्यक्त करणे टाळले.

त्या म्हणाल्या, स्वातंत्र्यानंतर काश्मीरचे राजा महाराजा हरिसिंह संधी करारावर हस्ताक्षर करत नव्हते. शेख अब्दुल्लांनी त्यांच्यावर हस्ताक्षर करण्यासाठी दबाव टाकला. नेहरू द्विधा मनस्थितीत होते आणि पाकिस्तानने अचानक हल्ले सुरू केले. पाकचे सैन्य उधमपूरच्या दिशेने येत होते. त्यावेळी नेहरूंनी संघाचे तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरूजींकडे संघाच्या स्वंयसेवकांची मदत मागितली. संघाचे स्वंयसेवक मदतीसाठी जम्मू-काश्मीरला गेले होते, असा दावा उमा भारतींनी केल्याचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे.

…म्हणून उमा भारती निवडणूक लढवणार नाही

दरम्यान, उमा भारतींनी यापुढे कुठलीही निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु, मंगळवारी त्यांनी आपल्या निर्णयापासून घुमजाव करत पुढील तीन वर्षे निवडणूक लढवणार नसल्याचे म्हटले. वय आणि आरोग्याचा हवाला देत, आता मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही. पण पक्षासाठी मी काम करतच राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली होती. त्या म्हणाल्या होत्या की, मी दोन वेळा खासदार राहिले आहे आणि पक्षासाठी खूप काम केले आहे. त्यामुळेच इतक्या कमी वयात मला शारीरिक त्रास सुरू झाला आहे. कंबर आणि गुडघ्यांच्या दुखण्यामुळे चालताना त्रास होतो. पण यापुढे पक्षाच्या प्रचाराचे काम करत राहीन.