भारताचे जवान एखाद्या पर्वताप्रमाणे देशाच्या सीमांचं रक्षण करत आहेत. लडाखमध्ये आपल्या देशाच्या सीमारेषेचं उल्लंघन करुन कुणीही घुसखोरी केलेली नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आपले लष्कर, जवान हे देशाची रक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रहित हेच आपल्या सगळ्याचं लक्ष आहे असंही मोदींनी म्हटलं आहे. सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर त्यांनी देशाशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुढच्या रणनीतीसाठी सगळ्या पक्षांनी दिलेल्या सूचना या माझ्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपल्या देशाच्या जनतेचं धैर्य वाढलं आहे. तसंच सैनिकांचं मनोबल वाढण्यासही या बैठकीने भूमिका पार पाडली आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

गलवानमध्ये २० जवान शहीद झाले. मात्र भारतमातेकडे डोळे वर करुन पाहणाऱ्यांना त्यांनी धडा शिकवला असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. राष्ट्रहित हा मुद्दा देशासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे राष्ट्रहितासाठी जे काही आवश्यक असेल ते करा असं लष्कराला सांगण्यात आलं आहे. इतकंच नाही तर आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत जे ऐक्य आपण सगळ्यांनी दाखवलं त्यामुळे जगभरात एक चांगला संदेश गेला आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.