दक्षिण आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय अध्यक्ष व शांततेचे नोबेल पारितोषिक विजेते नेल्सन मंडेला यांच्या स्मृती कार्यक्रमासाठी जगभरातून नेते येणार आहेत, दरम्यान मंडेला त्यांच्या अंत्यसंस्काराची पूर्वतयारीही करण्यात येत आहे. जोहान्सबर्ग येथील एफएनबी स्टेडियमवर मंगळवारी (१० डिसेंबर) त्यांच्या निधनानिमित्त स्मृतिसेवा (आदरांजली) अदा करण्यात येणार असून त्यावेळी खूप मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार आहे. या स्टेडियमची क्षमता ९५००० लोक बसतील एवढी आहे,  त्यावेळी काही परदेशी नेतेही उपस्थित राहतील. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी मंडेला यांच्या निधनानंतर १४ दिवसांचा दुखवटा जाहीर केला असून मंडेला यांचे पार्थिव तीन दिवस प्रिटोरिया येथील सरकारी इमारतींमध्ये ठेवण्यात येणार आहे.  त्यानंतर १५ डिसेंबरला त्यांच्या पार्थिवावर क्यूनू येथे त्यांच्या मूळ गावी सरकारी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्या गावात त्यांचे बालपण गेले, तेथील रहिवासी आपल्या प्रिय सुपुत्राच्या पार्थिवाची वाट पाहात आहेत.
८ डिसेंबरला राष्ट्रीय प्रार्थना दिन जाहीर करण्यात आला आहे. वर्णभेदी राजवटीविरोधात लढा देणारे मंडेला यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अनेक कार्यक्रम ११ ते १३ डिसेंबर दरम्यान होणार आहेत. अध्यक्षीय निवेदनात म्हटले आहे की, आपल्या देशाच्या अद्वितीय सुपुत्राच्या अंत्यसंस्कारांच्या पूर्वतयारीकरिता आपण सर्वजण एकत्र येऊ. सर्व लोकांनी चर्च, मशिदी, मंदिरे व इतर धार्मिक स्थळी जमून त्यांना आदरांजली वाहण्यात यावी. मंडेला यांच्या स्मृती कार्यक्रमासाठी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह दोन माजी अध्यक्षही यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. व्हाइट हाऊसचे प्रवक्ते जे कार्नी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या प्रथम नागरिक मिशेल ओबामा याही स्मृती कार्यक्रमात सहभागी होतील. ओबामा हे एअरफोर्स वन विमानाने माजी अध्यक्ष जॉर्ज बुश व त्यांच्या पत्नी लॉरा बुश यांच्यासह येणार आहेत. माजी अध्यक्ष बिल क्लिंटन हे त्यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन यांच्यासह येणार आहेत.