गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांची प्रकृती चिंताजनक बनलीये. मंडेला यांना गेल्या आठ जूनला फुफ्फुसातील जंतूसंसर्गामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीत चढ-उतार होत आहेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांनी रविवारी रात्री मंडेला यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयात जाऊन विचारपूस केली. त्यावेळी रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मंडेला यांची प्रकृती गेल्या २४ तासांपासून चिंताजनक असल्याचे सांगितले. मंडेला यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी डॉक्टर सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहेत, असे झुमा यांनी रुग्णालयातून बाहेर पडल्यावर सांगितले. झुमा यांनी मंडेला यांची पत्नी ग्रॅका मॅशेल यांचीही रुग्णालयात भेट घेतली.