दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांची पत्नी आणि वर्णभेदविरोधी कार्यकर्त्यां विनी मंडेला (वय ८१) यांचे सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जोहान्सबर्गमधील रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.

नेल्सन मंडेला यांच्याशी विनी १९५८ ते १९९६ अशी ३८ वर्षे विवाहबद्ध राहिल्या. नेल्सन मंडेला यांचे २०१३ साली निधन झाले होते. दक्षिण आफ्रिकेतील वंशवादविरोधी लढय़ाचे नेतृत्व नेल्सन मंडेला यांनी केले असले तरी विनी-मडिकीझेला मंडेला यांचीही वंशवादविरोधी कार्यकर्ती म्हणून स्वतंत्र ओळख होती. पतीप्रमाणेच त्यांचीही उमेदीची बहुतांशी वर्षे कारावासात गेली. प्रत्यक्ष कारावास संपल्यानंतरही अनेक वर्षे त्या घरी स्थानबद्धतेत होत्या. नेल्सन मंडेला तुरुंगात असताना विनी यांनी त्यांचा लढा तेवत ठेवला होता.

विनी यांची नंतरची कारकीर्द मात्र अनेक आरोपांनी डागाळली गेली होती. मात्र वर्णभेदविरोधी लढय़ादरम्यान झालेल्या अत्याचारप्रकरणी त्यांच्यावर खटला चालवण्यात आला होता. अपहरण आणि हल्ल्याच्या प्रकरणात १९९१ साली त्या दोषी ठरल्याने त्यांना दंडही भरावा लागला होता. १९९७ साली त्यांच्यावर या प्रकरणात पुन्हा आरोप झाले. दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झालेल्या पहिल्या बहुवांशिक निवडणुकीत त्या संसदेत निवडून गेल्या. त्यानंतर त्या भ्रष्टाचार प्रकरणात दोषी ठरल्या होत्या.

गेले वर्षभर प्रकृती अस्वास्थ्यामुळे विनी बराच काळ रुग्णालयातच होत्या. सोमवारी त्यांचा जीवनप्रवास संपला.