माणसातील काळा-गोरा भेद नष्ट व्हावा यासाठी आयुष्यभर लढा देणारे दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्रपिता दिवंगत भारतरत्न नेल्सन मंडेला यांच्या १०१व्या जयंतीनिमित्त काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत. ‘नेल्सन अंकल’ हे माझे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिवंगत नेल्सन मंडेला यांच्या भेटीचा एक जुना फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये मंडेला यांनी प्रियंका गांधींचा मुलगा रेहानला आपल्या हातात पकडले आहे. तसेच प्रियंका त्यांच्या बाजूला बसलेल्या असून या दोघांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. २००१ मधील हा फोटो आहे. रेहान नुकताच १९ वर्षांचा झाला असून त्याने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नवमतदार म्हणून मतदान केले आहे. मात्र, प्रियंका गांधींनी पोस्ट केलेल्या फोटोत तो साधारण एक वर्षांचा बाळ असलेला दिसत आहे.

या फोटोसह प्रियंका यांनी नेल्सन मंडेलांबाबत काही ओळी लिहिल्या आहेत. त्या म्हणतात, ‘जग नेल्सन मंडेलांसारख्या एका खऱ्या महापुरुषाला मुकले आहे. त्यांचे जीवन म्हणजे सत्य, प्रेम आणि स्वातंत्र्याचा करार आहे. माझ्यासाठी ते ‘नेल्सन अंकल’ होते ते नेहमीच माझे प्रेरणास्थान आणि मार्गदर्शक राहतील.’

वर्णभेदाविरोधात आयुष्यभर लढा दिलेल्या नेल्सन मंडेला यांना दक्षिण अफ्रिकेत जन्मठेपेची शिक्षा झाली. १९६२मध्ये त्यांची येथील तुरुंगात रवानगी झाल्यानंतर पुढे ते २७ वर्षे तुरुंगात होते. त्याच्या प्रदीर्घ लढ्यानंतर दक्षिण अफ्रिकेत काळा-गोरा भेद नष्ट होऊन नवे परिवर्तन घडून आले होते. त्यानंतर ते दक्षिण अफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यही बनले. दरम्यान, ५ डिसेंबर २०१३ रोजी वयाच्या ९५व्या वर्षी त्यांचे निधन झाले.