नेपाळमध्ये मुसळधार पाऊस कोसळून झालेल्या भूस्खलनामुळे देशाच्या ईशान्येकडील पहाडी भागातील सहा खेडी गाडली गेली असून त्यात किमान ४१ ठार झाले आहेत. गेल्या २१ एप्रिलच्या भूकंपानंतर देशात घडलेली ही दुसरी मोठी दुर्घटना आहे.
या भूस्खलनाचा फटका तापलेजंग जिल्ह्य़ाला बसला आणि त्यात ४१ लोक ठार, तर आठजण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळावरून आतापर्यंत १२ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेक रहिवाशी अद्याप बेपत्ता असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या भूस्खलनात सहा खेडी वाहून गेली.
नेपाळचे सैन्य आणि पोलीस कर्मचारी यांनी मदतकार्य सुरू केले आहे, परंतु सततचा पाऊस आणि पूर यामुळे मदतकार्यात अडथळे येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूस्खलनामुळे मेची महामार्गावरील वाहतूक सेवांमध्येही अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नेपाळच्या पर्वतीय
भागात असे भूस्खलन नेहमीच होत असते.