गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचं वातावरण आहे. तर दुसरीकडे करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देश आणि जगभरासमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. तर दुसरीकडे चीननं नेपाळ आणि अफगाणिस्तानला पाकिस्ताननप्रमाणे बनण्यास सांगितलं आहे. तसंच करोनाच्या संकटाचा सामना करण्यासाठी चारही देशांनी एकत्र यावं, असंही चीननं म्हटलं आहे.

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी सोमवारी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि नेपाळमधील आपल्या समकक्ष अधिकाऱ्यांसोबत पहिल्या संयुक्त डिजिटल बैठकीचं आयोजन केलं होतं. यावेळी त्यांनी करोनाचा प्रसार रोखण्यासाठी, अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी तसंच ‘बीआरआय’ पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू करण्याच्या चार कलमी योजनेवर चर्चा केली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री मोहम्मद हनीफ आत्मार आणि नेपाळचे परराष्ट्रमंत्री प्रदीपकुमार ग्यावली या बैठकीस उपस्थित होते. परंतु यावेळी मात्र पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी हे उपस्थित नव्हते.

चीनकडून चार कलमी योजनेचा प्रस्ताव

कुरेशी यांच्याऐवजी पाकिस्तानातील आर्थिक कामकाज विभागाचे मंत्री मखदूम खुसरो बख्तियार यांनी पाकिस्तानचं नेतृत्व केलं. या चार देशांच्या या पहिल्या बैठकीत वांग यांनी जागतिक आरोग्य संघटनेला या महामारीचा सामना करण्यासाठी एकमत निर्माण करणं, करोना विषाणूच्या संकटाचं राजकारण टाळण्यासाठी आणि संयुक्तपणे जागतिक आरोग्य समुदाय निर्माण करण्यासाठी आपली भूमिका बजावण्याचे आवाहन केलं.तसंच यावेळी त्यांनी चार कलमी योजनेचा प्रस्तावही सादर केला.

या महिन्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून माघार घेण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल संयुक्त राष्ट्राला माहिती दिली. ट्रम्प प्रशासनाने जागतिक आरोग्य संघटनेवर करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चीनची बाजू घेतल्याचा आरोप केला होता. तसंच जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातचे बाहुले असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.