गिर्यारोहणाची आवड असणाऱ्यांचे स्वप्न असते ते म्हणजे माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करणे. त्यात ते शिखर जर एकट्याने सर केले तर तो आनंद म्हणजे दुधात साखरच! मात्र नेपाळने गिर्यारोहकांच्या सुरक्षेचा विचार करून नेपाळच्या अखत्यारीत असलेल्या शिखरांवर आणि माऊंट एव्हरेस्टवर एकट्या गिर्यारोहकाला जाण्यास मनाई केली आहे.

माऊंट एव्हरेस्टची गणना जगातील सर्वोच्च शिखरांमध्ये केली जाते. या शिखरावर पोहचणे हे गिर्यारोहकांसाठी स्वप्नच असते. या स्वप्नपुर्तीसाठी अनेक गिर्यारोहक सराव करत असतात. मेहनत घेत असतात. मात्र आता एकट्या गिर्यारोहकाला नेपाळमधमधून माऊंट एव्हरेस्टवर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. ‘द न्यूयॉर्क टाइम्स’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. एवढेच नाही तर दिव्यांग आणि अंध गिर्यारोहकांसाठीही गिर्यारोहणावर बंदी घालण्यात आली आहे. नेपाळने नवे सुरक्षा नियम लागू केले आहेत ज्या आधारे ही बंदी घालण्यात आली. नेपाळ गिर्यारोहरण समितीचे अधिकारी बीर लामा यांनी ही माहिती दिली.

गिर्यारोहण सुरक्षित व्हावे यासाठी सुरक्षेचे नियम नव्याने लागू करण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये गिर्यारोहणासाठी गेलेल्या अनेक गिर्यारोहकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत ६ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. ज्यामध्ये ८५ वर्षांच्या मिन बहादुर शेरचान यांचाही समावेश होता. एव्हरेस्ट सर करणाऱ्या वयस्कर गिर्यारोहकांमध्ये सगळ्यात जास्त वयाचे गिर्यारोहक बनावे हे शेरचान यांचे स्वप्न होते. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.

२०१७ या वर्षात बहुतांश गिर्यारोहकांनी एव्हरेस्ट सर करण्याचा प्रयत्न केला. सुप्रसिद्ध गिर्यारोहक उली स्टेक हे देखील एव्हरेस्ट सर करण्याच्या तयारीत असतानाच त्यांचा मृत्यू झाला. या सगळ्या घटना टाळण्यासाठीच सुरक्षेचे नवे नियम लागू करण्यात आले आहेत. नव्या नियमांनुसार विदेशातील गिर्यारोहकांना आता एव्हरेस्ट सर करण्यासाठी त्यांच्यासोबत एक स्थानिक गाईड ठेवणे बंधनकारक असणार आहे. या नव्या नियमांमुळे इथल्या स्थानिक गाईड्सना काम मिळण्यासही मदत होणार आहे. काही जणांना हा निर्णय चुकीचा वाटतो आहे. मात्र नेपाळ मात्र या निर्णयात बदल करण्याच्या विचारात नाही.