नेपाळला भूकंपाचा जबरदस्त तडाखा बसल्यानंतर तेथील लोकांना नैसर्गिक आपत्तीनंतर आता जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडय़ाबरोबरच काळ्या बाजाराचाही सामना करावा लागत आहे. अनेक व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून जीवनावश्यक वस्तू दुप्पट किंमतीने विकण्यास सुरुवात केली आहे. यामधून मुलांचे अन्नही सुटलेले नाही.
विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांच्या या वर्तनाला कोणीही अटकाव करू शकत नसल्यामुळे लोक चांगलेच हताश झाले आहेत. काठमांडूत सध्या अध्र्या लीटर दुधासाठी ७० नेपाळी रुपये मोजावे लागत आहेत. फ्लॉवर व टॉमेटोचा दर सध्या अनुक्रमे प्रती किलोला ६० व ३० रुपये झाला आहे. व्यापाऱ्यांनी या ‘भाववाढी’ चे समर्थन करताना मनुष्यबळाची कमतरता आणि खर्चिक वाहतूक व्यवस्थेवर या कथित आपत्तीचे खापर फोडले आहे.