नेपाळमधील ओली सरकार भारतविरोधी वक्तव्यावरून अडचणीत सापडलं आहे. भारताकडून सतत नेपाळचं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नेपाळचे पंतप्रधान के.पी.ओली शर्मा यांच्याकडून करण्यात आला होता. यावरून विरोधकांनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. माजी पंतप्रधान पुष्पा कमल दहल प्रचंड यांच्यासह सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या भारतविरोधी टीकेविरोधात मंगळवारी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पंतप्रधानांची टीका राजकीयदृष्ट्या योग्य नव्हती असं प्रमुख नेत्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान ओली यांच्या निवासस्थानी सत्ताधारी पक्षाची एक बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान ओली यांच्या वक्तव्याच्या निषेध करण्यात आला. “भारत त्यांचं सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे, दुतावासात आणि हॉटेलमध्ये यासाठी हालचाली सुरू आहेत. नेपाळमधील काही नेतेही यात सहभागी आहेत,” असा आरोप ओली यांनी केला होता. तसंच यावेळी राजकीय दृष्या त्यांचा हा आरोप योग्य नव्हता असा सूर या बैठकीतून उमटला. दरम्यान, “पंतप्रधानांकडून करण्यात आलेल्या अशा वक्तव्यामुळे शेजारी राष्ट्रासोबत आपले संबंध बिघडू शकतात,” असं मत प्रचंड यांनी यावेळी व्यक्त केलं.

शेजारी राष्ट्रावर आणि आपल्याच पक्षाच्या नेत्यांवर अशाप्रकारचे आरोप करणं योग्य नाही, असं एका वरिष्ठ नेत्यानं प्रचंड यांच्या हवाल्यानं सांगितलं. “प्रचंड यांच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नेते माधव कुमार नेपाल, झालानाथ खनल, उपाध्यक्ष बमदेव गौतम आणि प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ यांनी पंतप्रधानांना या आरोपांवरील पुरावे सादर करण्याचं आणि आपला राजीनामा देण्यास सांगितलं. पंतप्रधानांनी नैतिकतेच्या दृष्टीनं आपला राजीनामा दिला पाहिजे असं म्हणतं पंतप्रधानांनी बैठकीत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही,” असंही त्यांनी सांगितलं.