नेपाळची संसद नवीन पंतप्रधानांची निवड उद्या करणार असून, सध्याचे पंतप्रधान सुशील कोईराला यांनी राजीनामा दिला. नवीन राज्यघटनेच्या विरोधात भारत सीमेवरील नाक्यांवर आंदोलन सुरू असताना राजकीय पक्षात हा पेच सोडवण्याबाबत कुठलेही मतैक्य झालेले नाही.

कोईराला यांनी अध्यक्ष रामबरण यादव यांच्याकडे राजीनामा सादर केला व तो त्यांनी स्वीकारला. कोईराला यांनाच नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करण्यास सांगण्यात आले आहे.
संसदेत उद्या नवीन पंतप्रधान निवडण्यासाठी मतदान होणार आहे. त्याआधीच कोईराला यांनी राजीनामा दिला असला तरी ते पुन्हा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. त्यांनी नेपाळी काँग्रेस पक्षाकडून अर्ज भरला असून, त्यांच्याविरोधात सीपीएन-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली हे मैदानात आहेत. कोईराला व ओली यांनी उमेदवारी अर्ज भरले आहेत. माजी पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी कोईराला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. ओली यांच्या नावाचा प्रस्ताव संयुक्त सीपीएन माओवादी अध्यक्ष प्रचंड यांनी मांडला.