यूएस- बांगलादेश एअरलाइन्सचे विमान सोमवारी दुपारी नेपाळमधील काठमांडूजवळ कोसळले. लँडिंग करताना ही दुर्घटना घडली असून विमानात ६७ प्रवासी होते. यातील १७ जणांची सुटका करण्यात आल्याचे समजते.

यूएस- बांगला एअरलाइन्सचे विमान सोमवारी दुपारी काठमांडूमधील त्रिभूवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंगच्या तयारीत होते. विमान ढाकावरुन काठमांडूला परतत होते. विमानात ६७ प्रवासी आणि ४ कॅबिन क्रू सदस्य आहेत. यात ३७ पुरुष, २७ महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. लँडिंगच्या दरम्यान विमान धावपट्टीवरुन घसरले आणि लगतच्या फुटबॉल मैदानात कोसळले. अवघ्या काही क्षणातच विमानाने पेट घेतला. आपातकालीन यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत १७ प्रवाशांची सुटका केली. तर उर्वरित लोकांचा शोध घेतला जात आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी विमान लँड होताना ही दुर्घटना घडली. नेपाळ सैन्य आणि त्रिभुवनदास विमानतळावरील आपातकालील पथकाचे जवान घटनास्थळी मदतकार्य करत आहे.