नेपाळमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या नेपाळी काँग्रेसने पंतप्रधानपदासाठी दावा करण्याचा निर्णय घेतला आहे. के.पी. शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील सरकार गडगडल्यानंतर नवे सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी दिलेल्या गुरुवारच्या मुदतीपूर्वी इतर पक्षांशी समझोता करण्यासाठी हा पक्ष त्यांच्याशी बोलणी करण्यात व्यग्र झाला आहे.

नेपाळी काँग्रेसचे अध्यक्ष शेरबहादूर देऊबा यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक होऊन नवे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. देऊबा यांनी मंगळवारी विरोधी पक्षनेत्यांसोबत बैठक घेऊन, आपल्या नेतृत्वाखाली नवे सरकार स्थापन करण्याच्या पर्यायाबाबत चर्चा केली. या बैठकीला सीपीएम- माओइस्ट सेंटरचे अध्यक्ष पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ आणि जनता समाजवादी पार्टीचे (जेएसपी-एन) दुसरे अध्यक्ष उपेंद्र यादव हजर होते. आपला पक्ष देऊबा यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून पाठिंबा देईल, असे संकेत प्रचंड यांनी दिले. तथापि, २७१ सदस्यांच्या प्रतिनिधीसभेत ३२ सदस्य असलेल्या जेएसपी-एनमध्ये देऊबा यांना पाठिंबा देण्याबाबत मतभेद आहेत.

प्रतिनिधी सभेत ६१ सदस्य असलेली नेपाळी काँग्रेस व ४९ सदस्य असलेली माओइस्ट सेंटर हे जेएसपी-एनच्या पाठिंब्याशिवाय बहुमताचे सरकार स्थापन करू शकत नाही. या पक्षाच्या दुसऱ्या अध्यक्षांनी देऊबा यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची हमी दिली असली, तरी प्रथम अध्यक्ष महंत ठाकूर यांचा या कल्पनेला विरोध आहे. ‘यापूर्वी पंतप्रधान राहिलेली नसेल, अशा व्यक्तीला नवा पंतप्रधान बनवायला हवे’, असे ट्वीट करून जेएसपी-एनचे ज्येष्ठ नेते बाबुराम भट्टराय यांनी देऊबा यांच्या उमेदवारीत खोडा घातला.