आरोग्यास घातक असलेल्या अजिनोमोटो आणि शिसे यांचा अतिप्रमाणात वापर केल्याच्या आरोपावरून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मॅगीने बाजारातून सर्व उत्पादने माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. ‘मॅगी खाण्यास सुरक्षित आहे. मात्र, आम्ही आमच्या ग्राहकांचा विश्वास गमावला आहे. तो परत मिळवू आणि मगच पुन्हा परतू’, असा निर्धार मॅगीउत्पादक असलेल्या नेस्ले कंपनीने व्यक्त केला आहे.
उत्तर प्रदेशातील नमुन्यांमध्ये दोष आढळल्याने बहुतांश राज्यांनी मॅगीच्या नमुन्यांची तपासणी करण्याचा सपाटा लावला आहे. तर अनेक राज्यांनी काही कालावधीपुरता मॅगीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या वादाच्या पाश्र्वभूमीवर नेस्लेचे जागतिक प्रमुख (ग्लोबल सीईओ) पॉल बल्क शुक्रवारी भारतात दाखल झाले. त्यांनी राजधानी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन नेस्ले मॅगीची सर्व उत्पादने माघारी बोलवत असल्याचे जाहीर केले.
 मॅगीबाबत ग्राहकांच्या मनात गोंधळ निर्माण केला जात असल्याचे ते म्हणाले. शिसे आणि अजिनोमोटो यांचे प्रमाण मॅगीत प्रमाणातच असून मॅगी खाण्यास सुरक्षित असल्याचा दावा केला.
 तसेच या प्रकरणातील चौकशीबाबत भारतीय तपाससंस्थांना सहकार्य करू, असेही बल्क यांनी सांगितले.
 मॅगीची किती उत्पादने माघारी घेतली जाणार याबाबत मात्र त्यांनी काहीही सांगण्यास नकार दिला. ग्राहकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्याचे आमचे उद्दिष्ट असून लवकरच आम्ही बाजारात परतू, असेही बल्क यांनी स्पष्ट केले.  

मॅगी नको आम्हाला !
मॅगीवर बंदी घालण्यात यावी यासाठीच्या आंदोलनात कोलकता  शुक्रवारी लहान मुलेही सहभागी झाली.