फाइल्समधील धक्कादायक माहिती
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या ६४ फाइल्समधील जी गुप्त कागदपत्रे शुक्रवारी अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली, त्यावरून नेताजी व त्यांचे कुटुंबीय यांच्यावर भारतीय गुप्तचर संस्थांनी सतत पाळत ठेवल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीला आले आहे. याशिवाय, सुभाषचंद्र यांच्या मृत्यूबाबत वेगवेगळ्या वर्तुळांमध्ये ज्या शंका कायम ठेवण्यात आल्या, त्यांचाही उल्लेख यात आहे.
खुल्या करण्यात आलेल्या एका फाइलमध्ये नेताजींचे पुतणे एस.के. बोस यांनी त्यांचे वडील व नेताजींचे मोठे भाऊ शरतचंद्र बोस यांना १९४९ साली लिहिलेले एक पत्र आहे. नेताजींचे एका रेडिओ केंद्रावर भाषण झाल्याची माहिती आपल्याला मिळाल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस हे १९४५ साली बेपत्ता झाले होते. त्या वर्षी १८ ऑगस्ट रोजी तायवानमधील ताइहोकू विमानतळावर झालेल्या विमान अपघातात ते मरण पावले, ही बाब त्यांच्या काही कुटुंबियांनी कायम अमान्य केली आहे. त्या वेळेस जपान व चीनमध्ये ‘डाय’ या  साप्ताहिकाच्या प्रतिनिधी डॉ. लिली अॅबेग यांनी शरतचंद्र बोस यांना पत्र लिहून सुभाषबाबू जिवंत असल्याची माहिती दिली होती.
सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फाइल्स खुल्या
गेल्या सात दशकांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या रहस्यमयरीत्या गायब होण्यावर प्रकाश टाकू शकतील अशा ६४ फाइल्स पश्चिम बंगाल सरकारने शुक्रवारी खुल्या केल्या. केंद्र सरकारनेही आपले अनुकरण करून १३० फाइल खुल्या कराव्या, असे आवाहन राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले.  पोलीस आणि सरकारच्या लॉकर्समध्ये ठेवण्यात आलेल्या १२ हजार ७४४ पाने असलेल्या ६४ फाइल्स बोस यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत खुल्या करण्यात आल्या.