15 December 2017

News Flash

नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजेच गुमनामी बाबा?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात झाला की ते

पीटीआय ,कोलकाता | Updated: December 5, 2012 5:27 AM

* १९४५ नंतरही नेताजी हयात होते
* अनुज धर यांचा नव्या पुस्तकात दावा
* पुराव्यादाखल ‘एपी’चे दुर्मीळ छायाचित्र सादर

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू १८ ऑगस्ट १९४५ रोजी विमान अपघातात झाला की ते त्यानंतरही जिवंत होते? आज ६८ वर्षांनंतरही या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळू शकलेले नाही. गेली अनेक वर्षे या गुढाचा शोध घेत असलेले संशोधक-लेखक अनुज धर यांनी मात्र आपल्या नव्या पुस्तकात नेताजी हे १९४५ नंतरही हयात होते; एवढेच नव्हे तर ते फैजाबाद येथे गुमनामी बाबा या नावाने वावरत होते, असा दावा केला आहे. हा दावा तसा नवा नसला तरी यावेळी त्याच्या पुष्टय़र्थ १९६९ मध्ये असोसिएटेड प्रेस (एपी) या वृत्तसंस्थेने घेतलेले एक छायाचित्र सादर करण्यात आले आहे.
‘इंडियाज बिगेस्ट कव्हरअप’ या आपल्या ताज्या पुस्तकात धर यांनी हे दुर्मीळ कृष्णधवल छायाचित्र समाविष्ट केले आहे. अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यातील संधिकराराच्या वाटाघाटींदरम्यान पॅरिसमध्ये हे छायाचित्र घेण्यात आले होते. त्यात व्हिएतनामच्या शिष्टमंडळात, चेहऱ्यावर कोणतेही भाव नसलेले पत्रकार आणि अन्य अधिकारी यांच्या मागे नेताजींशी साम्य असणारी व्यक्ती दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर मात्र अतिशय तेजस्वी भाव आहेत. नोबेल विजेते व्हिएतनामी नेते ले डय़ूक थो यांनी या शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.  या संदर्भात आपल्या पुस्तकात धर यांनी म्हटले आहे, ‘‘आपण या वाटाघाटींच्या वेळी उपस्थित होतो, असे गुमनामी बाबा ऊर्फ भगवानजी यांनी त्यांच्या अनुयायांना सांगितले होते. हे छायाचित्र गुमनामी बाबांचे असू शकते आणि गुमनामी बाबा हे नेताजी असू शकतात. त्यांचा बराचसा चेहरा दाढी-मिशांनी झाकलेला आहे. डोळ्यांवर मोठय़ा फ्रेमचा चष्मा आहे. आग्नेय आशियातल्या मुत्सद्दय़ांनी अशा दाढीमिशा राखणे हे जरा विचित्रच वाटते.’’  अमेरिका, ब्रिटन आणि भारतातील आता जाहीर करण्यात आलेल्या गोपनीय कागदपत्रांच्या, तसेच अन्य काही पुराव्यांच्या आधारे हे पुस्तक लिहिण्यात आले आहे.     

नेताजींचे काय झाले?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा अपघाती मृत्यू झाला, हे मानण्यास आजही भारतातील अनेक लोक तयार नाहीत. एवढेच नव्हे, तर खुद्द महात्मा गांधींचाही त्यावर विश्वास नव्हता असे सांगण्यात येते. या विषयाबाबतची लोकभावना ध्यानी घेऊन या गुढाचा शोध घेण्यासाठी केंद्र सरकारने आजवर तीन आयोग नेमले. परंतु त्यातूनही ठोस काही हाती लागले नाही. पहिल्या दोन्ही, न्यायमूर्ती खोसला आणि शाहनवाज  आयोगांनी नेताजींचा त्या अपघातातच मृत्यू झाला असल्याचा निष्कर्ष काढला. मात्र अखेरच्या मुखर्जी आयोगाने नेताजींच्या अपघाती मृत्यूची शक्यता फेटाळून लावली आहे. सुभाषबाबूंचे बंधू सुरेश बोस यांनीही नेताजींचा अपघाती मृत्यू झाला नसल्याचे म्हटले होते. नेताजींच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे सदस्य असलेल्या सुरेश बोस यांचा १९७२ मध्ये मृत्यू झाला. परंतु तत्पूर्वी त्यांनी एका शपथपत्रात, नेताजी तोवर जिवंत होते, असे म्हटले होते.   

कोण होते गुमनामी बाबा?
गुमनामी बाबा हे फैजाबाद येथील एका आश्रमात राहत असत. ते भगवानजी या नावानेही ओळखले जात. १९८५ मध्ये त्यांचा मृत्यू झाला. अनुज धर, तसेच अन्य काही संशोधकांच्या मते गुमनामी बाबा हेच नेताजी होते. धर यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटले आहे, की लोकांचे लक्ष आपणांकडे जाऊ नये यासाठी बाहेर जाताना बाबा अनेकदा वेशांतर करीत असत. आपल्या चेहरेपट्टीतही ते बदल करीत असत. त्यांना या कलेमध्ये खास रस होता. सोव्हिएत रशियामधून आपण कशी सुटका करून घेतली, त्यानंतर व्हिएतनाम युद्धात आपण कसे सहभागी झालो, हे त्यांनी त्यांच्या काही अनुयायांना सांगितले होते. आपण प्रकट झालो तर भारतावर जगातील महासत्ता र्निबध घालतील. म्हणूनच आपणास भूमिगत राहावे लागत आहे, असेही ते सांगत असत, असे धर यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.

First Published on December 5, 2012 5:27 am

Web Title: netaji subhashchandra bose means unknown baba