प. बंगाल सरकारची घोषणा

पश्चिम बंगाल सरकार पुढील शुक्रवारी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या वर्गीकृत फाईल्स उघड करणार असून त्यातून त्यांच्या मृत्यूचे गूढ उलगडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबाबतच्या फाईल्स किंवा कागदपत्रे खुली करण्यात येणार आहेत. ती सध्या राज्याच्या गृह खात्याच्या ताब्यात आहेत व ती शुक्रवारपासून जनतेसाठी खुली केली जातील. त्या एकूण ६४ फाईल्स आहेत, त्याहून एक किंवा दोन अधिक फाईल्स जाहीर केल्या जातील, असे बॅनर्जी यांनी सचिवालयात सांगितले. या फाईलमध्ये अंतर्गत सुरक्षेशी संबंधित काही आहे असे वाटत नाही. नेताजींचा मृत्यू नेमका कसा झाला हे जाणून घेण्याची सर्वाना इच्छा आहे. केंद्रालाही त्यांच्याकडील फाईल खुल्या करायला सांगणार का, असे विचारले असता त्या म्हणाल्या की, तो केंद्र सरकारचा निर्णय आहे त्यात आपण हस्तक्षेप करू शकत नाही. १९३७ ते १९४७ दरम्यान स्वातंत्र्य लढय़ाच्या ज्या नोंदी आहेत त्या डिजिटल पद्धतीने जतन केल्या जातील असे सांगण्यात आले.