इस्रायलमधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांच्या लिकूड पक्षाने दणदणीत विजय मिळवत चौथ्यांदा सत्ता पटकावली आहे, पॅलेस्टाईनच्या राष्ट्रदर्जावर कुठलीही तडजोड न करण्याच्या मुद्दय़ावर प्रचार केंद्रित करून त्यांनी विजय मिळवला. जवळपास सर्व मतांची गणती झाल्यानंतर त्यांच्या पक्षाला नेसेट या त्यांच्या पार्लमेंटमध्ये १२० पैकी २९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे लिकूड पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. झायोनियन युनियन या आयझ्ॉक हेरझोग यांच्या पक्षापेक्षा त्यांना पाच जागा जास्त मिळाल्या आहेत व इस्रायलमधील खंडित जनमताला मागे टाकून लोकांनी स्पष्ट जनादेश दिला असल्याचे सांगण्यात आले.
ज्यू राष्ट्र असलेल्या इस्रायलची सुरक्षा भक्कम करणे, इराणला अण्वस्त्र क्षमता नाकारणे व पॅलेस्टाईन शांतता प्रक्रियेत तडजोडीची भूमिका न घेणे या मुद्दय़ांवर लिकूड पक्षाने प्रचार केला होता.
निवडणूकपूर्व चाचण्यात झायनिस्ट युनियन चार किंवा पाच जागा जास्त मिळवून विजय होईल असे अंदाज देण्यात आले होते ते खोटे ठरले आहेत. द जॉइंट लिस्ट ऑफ अरब पार्टीज हा तिसरा मोठा पक्ष ठरवा आहे. त्यांना १४ जागा मिळाल्या, त्यापाठोपाठ येश अतिद, कुलानू, हबियत हायेह्य़ुदी, शास, यिसरायल बेटेन्यू, युनायटेड तोराह जुदाईझम व मेरेत्झ यांनी यश मिळवले आहे. १०३७२ मतदान केंद्रांवर ६५.७ टक्के मतदान झाले असून एकूण ५.८९ दशलक्ष मतदारांनी मतदानात भाग घेतला.