जगभरात लोकप्रिय असलेलं Netflix बुधवारी तब्बल तासाभरासाठी डाऊन होतं. सुरुवातीला नेटफ्लिक्स डाऊन असल्याचं वृत्त वाऱ्यासारखं सोशल मीडियावर पसरलं. याबाबत थोड्याच अवधीत तब्बल १६०० तक्रारी देखील आल्याचं सांगितलं गेलं. नेटफ्लिक्सकडून देखील यासंदर्भात माहिती घेण्यात आली आणि त्यानंतर हा गोंधळ फक्त युकेमध्येच झाला असून इतर ठिकाणी ते सुरळीत सुरू असल्याचं स्पष्ट झालं. एव्हाना जगभरातल्या युजर्सनी नेटफ्लिक्सवर लॉगइन करून सेवा पूर्ववत सुरू असल्याचं सांगायला सुरुवात केली होती. यासंदर्भात डेलीमेलने सविस्तर वृत्त दिलं असून त्यामध्ये नेटफ्लिक्स युकेमध्ये तासाभरासाठी डाऊन झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

नेमकं झालं काय होतं?

बुधवारी युकेमधील स्थानिक वेळेनुसार सकाळच्या सुमारास अचानक युजर्सला नेटफ्लिक्सवरचा कोणताही कंटेंट पाहण्यात अडचणी येऊ लागल्या. काही युजर्सला ‘नो कनेक्शन’चे मेसेज येऊ लागले, काहींना NSES-500 असा मेसेज दिसू लागला, तर काहींना कोणतेही व्हिडीओ, सिनेमे किंवा वेब सीरिज दिसू न शकल्यामुळे गोंधळ उडाला. नेटफ्लिक्स वेबसाईटवर देखील वारंवार पेज रिफ्रेश करून देखील कंटेंट पाहाता येत नसल्यामुळे गोंधळ अजून वाढला.

 

 

अखेर तासाभराच्या गोंधळानंतर नेटफ्लिक्सच्या प्रवक्त्याने यासंदर्भात मेल ऑनलाईनकडे खुलासा केल्याचं डेलीमेलच्या वृत्तामध्ये म्हटलं आहे. “नेटफ्लिक्सवर व्हिडीओ पाहताना काही युजर्सला अडचणी येत होत्या. हा प्रकार तासाभरासाठी सुरू होता. पण आमच्या टेक्निकल टीमने ही समस्या आता सोडवली असून युजर्सला सामना कराव्या लागलेल्या अडचणींसाठी आम्ही दिलगीर आहोत”, असं या प्रवक्त्याने म्हटलं आहे.