कर्नाटकात भाजपाची विजयाच्या दिशेने आगेकूच सुरु असताना सोशल मीडियाने भाजपाला त्यांच्या जाहीरनाम्याची आठवण करुन दिली आहे. कर्नाटकात सत्ता मिळवण्यासाठी भाजपाने शेतकऱ्यांना कर्जमाफी, मोफत स्मार्टफोन, लॅपटॉप आणि सोनं देण्याचे आश्वासन दिले आहे. कर्नाटकाच्या या निकालावर सोशल मीडियावर वेगवेगळया प्रतिक्रिया उमटत असताना युझर्सनी भाजपाला जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची आठवण करुन दिली आहे.

काय दिली होती आश्वासने

– आगामी अर्थसंकल्पात कृषी खात्याचा स्वतंत्र अर्थसंकल्प असेल.

– शेतकऱ्यांचे एक लाखांपर्यंतचे कर्जमाफ केले जाईल.

– दारिद्य्र रेषेखालील महिलांना व मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन्स तसेच राज्यभरात स्त्री सुविधा योजनेअंतर्गत महिलांना एक रुपयात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करुन देऊ.

– महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन केले जाईल.

– दारिद्य्र रेषेखालील मुलींच्या लग्नासाठी विवाह मंगल योजना सुरु केली जाणार आहे. याअंतर्गत त्यांना ३ ग्रॅम सोने आणि २५ हजार रुपयांची मदत केली जाईल.

– दारिद्य्र रेषेखालील महिलांना मोफत स्मार्टफोनही दिले जातील.

– महाविद्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मोफत लॅपटॉप दिला जाईल.