आत्मचिंतन सुट्टीवरून परतलेले काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सलग तिसऱ्या दिवशी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. शून्य प्रहरात नेट न्यूट्रॅलिटीवरून केंद्र सरकार कॉपरेरेट कंपन्यांचे भले करणार असल्याचा आरोप राहुल यांनी केला. अर्थात राहुल यांच्या ‘स्क्रीप्ट रायटर्स’ने लिहून दिलेल्या भाषणात पूर्वार्ध व उत्तरार्धाचा परस्परसंबध नव्हता. भाषणाच्या प्रारंभी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदी यांच्यावर लिहिलेल्या लेखाचे कौतुक करणाऱ्या राहुल गांधी यांना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्दय़ावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर राहुल गांधी यांनी नेट न्यूट्रॅलिटीवर बोलण्यास सुरुवात केली. राहुल यांच्या आरोपांचे खंडन करून केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सर्वाचे इंटरनेट स्वातंत्र्य जपण्याची जबाबदारी सरकारची असल्याचे सांगितले. १२५ कोटी जनतेला इंटरनेट मिळण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले.
दरम्यान, प्रश्नोत्तराचा तास स्थगित करण्याची नोटीस राहुल गांधी यांनी लोकसभा अध्यक्षांकडे दिली होती. मात्र ऐन प्रश्नोत्तराचा तास सुरू होत असताना राहुल गांधी उपस्थित नव्हते. सुमित्रा महाजन यांनी थेट प्रश्न पुकारला. त्यामुळे राहुल गांधी यांनी दिलेली नोटीस व्यर्थ ठरली. हा मुद्दा काल (मंगळवारी) सीपीआयएमच्या खासदारांनी उपस्थित केल्याचे महाजन यांनी शून्य प्रहरात राहुल यांना सांगितले. राहुल म्हणाले की, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कुणा अन्य देशाच्या राष्ट्रप्रमुखाविषयी असा लेख लिहिण्याची ही दुसरीच घटना आहे. यापूर्वी अमेरिकेच्या अध्यक्षांनी गोर्बाचेव्ह यांची प्रशंसा केली होती. त्यानंतर राहुल गांधी थेट नेट न्यूट्रॅलिटीच्या मुद्दय़ावर बोलू लागले. सुमारे दहा लाख युवकांनी नेट न्यूट्रॅलिटीविरोधात फेसबुक, ट्विटर व तत्सम सोशल नेटवर्किंग साईट्सवर निषेध नोंदविला आहे. पण हे सरकार (इंटर)नेट उद्योजकांच्या हाती देण्याच्या इराद्यात आहे. ट्रायचा निर्णय रोखून सामान्यांच्या हिताचा कायदा मंजूर करण्याची मागणी राहुल यांनी केली.
रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना खणखणीत प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, जानेवारी २०१५ मध्ये या विषयाचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. ही समिती मे महिन्यात अहवाल सादर करेल. कोणत्याही परिस्थितीत इंटरनेट वापरण्यावर बंधन आणले जाणार नाही वा कुणाच्याही अधिकारांवर गदा आणली जाणार नाही.‘ट्राय’ या संबंधी कायद्यावर विचार करू शकते. मात्र निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे.
अर्थात इंटरनेट स्वातंत्र्यावर बोलणाऱ्यांनी २०१२ मध्ये कुणाचे ट्विटर हॅण्डल बंद केले होते, याची माहिती घ्यावी, असा टोमणा रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना लगावला. मंत्र्यांच्या उत्तरानंतर एक प्रश्न विचारण्याची विनंती राहुल गांधी वा त्यांचे सहकारी करीत होते. मात्र शून्य प्रहरात असा प्रश्न विचारता येणार नसल्याचे सांगत सुमित्रा महाजन यांनी काँग्रेस नेत्यांना जुमानले नाही.

प्रभोक्षक भाषणांवरून खडाजंगी
हिंदुत्ववादी संघटनेच्या नेत्यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांवरून आज लोकसभेच्या शून्य प्रहरात सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी झाली. हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्याने केलेल्या प्रक्षोभक भाषणावरून के. सी. वेणुगोपाल यांनी सरकावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून अल्पसंख्याकांवरील हल्ले वाढल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या विधानास केंद्रीय राज्यमंत्री राजीवप्रताप रूडी यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, संसदेबाहेर कुणीही काहीही बोलले तरी त्याची चर्चा सभागृहात होते. हे चुकीचे आहे. काँग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, प्रक्षोभक वक्तव्ये करणारे तुमचे (भाजप) समर्थक आहेत. त्यांच्यापैकी दोनेक जणांना शिक्षा झाल्यास हा प्रकार बंद होईल. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, वारंवार असे मुद्दे उपस्थित करून धर्मात फूट पाडली जात आहे. आवश्यकता वाटल्यास चर्चसह अन्य किती धार्मिक स्थळांवर हल्ले झाले आहेत, याची विस्तृत आकडेवारी सादर केली जाईल. उत्तराने समाधान न झाल्याने काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.