सन २०२० पर्यंत देशातील विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या ३० कोटींहून अधिक होणार आहे. त्यामुळे देशातील छोटी छोटी शहरेदेखील हवाई मार्गाने जोडण्यासाठी १०० पेक्षा अधिक विमानतळांचे जाळे उभारण्याची योजना असल्याची माहिती पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी दिली.
अजमेर जिल्ह्य़ातील किशनगड येथे उभारण्यात येणाऱ्या विमानतळाचा कोनशिला समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते पार पडला. या वेळी त्यांनी देशभरात विमानतळांचे जाळे उभारण्याची घोषणा केली. किशनगड येथे उभारण्यात येणारे विमानतळ २०१६ पर्यंत कार्यान्वित होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, सुरुवातीला मुख्य शहरांमध्ये विमानतळ उभारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले होते. मात्र आता छोटय़ा शहरांमध्येही १०० हून अधिक विमानतळ बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे देशातील बहुतेक सर्व शहरे हवाईमार्गाने जोडली जातील. या योजनेअंतर्गत किशनगड येथे पहिले विमानतळ उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
अजमेर शहर हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणी प्रसिद्द सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिस्तीचा दरगा, पुष्करमधील ब्रह्म मंदिर आहे. याशिवाय हा भाग मार्बल व्यवसायासह अनेक उद्योगांसाठीही ओळखला जातो. नव्या विमानतळामुळे या भागातील विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
गेल्या वर्षी विमानाने प्रवास करणाऱ्या १६ कोटी प्रवाशांची नोंद झाली होती. यात उत्तरोत्तर वाढ होत असून २०२० पर्यंत हीच प्रवासी संख्या ३० कोटींच्या वर जाईल. त्यामुळे या क्षेत्रात सरकारी तसेच खासगी क्षेत्रानेही मोठय़ा प्रमाणात गुंवतणूक करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, नागरी उड्डयनमंत्री अजित सिंग आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.