इराण आणि अमेरिकेतील तणाव वाढला असून अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करु नका अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील, असा इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.

इराणशी शत्रुत्व महागात पडेल, असा इशारा इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांनी दिला होता. अमेरिकेने इराणशी २०१५ साली केलेल्या अणुकरारातून माघार घेतली आहे. इराण कराराच्या अटी पाळत नसल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. या पार्श्वभूमीवर इराणचे अध्यक्ष रुहानी यांनी दोन दिवसांपूर्वी अमेरिकेला इशारा दिला होता. अमेरिकेने सिंहाच्या शेपटीशी खेळणे थांबवावे आणि या पुढे इराणशी युद्ध झाल्यास ते सर्वात महाभयंकर युद्ध असेल, असेही त्यांनी म्हटले होते.

रुहानी यांच्या इशाऱ्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले आहे. ट्रम्प म्हणाले, यापुढे पुन्हा कधीही अमेरिकेला धमकी देण्याची हिंमत करु नका, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील. इतिहासात असे परिणाम तुम्ही कधीही भोगले नसतील. तुमच्या हिंसाचाराच्या धमक्यांसमोर आम्ही नमते घेणार नाही हे लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या ट्विटनंतर दोन्ही देशांमधील तणावात आता भर पडली आहे. अणुकरारातून माघार घेतल्यानंतर अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले आहेत.