‘८०० वर्षांनी देशाला हिंदू शासक मिळाला’ हे वक्तव्य माझे नसल्याचा राजनाथ सिंहांचा दावा
गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या असहिष्णुतेची चर्चा केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेल्या कथित वक्तव्याभोवती केंद्रित झाल्याने सोमवारी लोकसभा दणाणली. माकपच्या मोहम्मद सलीम यांनी ‘आऊटलूक’ मॅगझिनचा संदर्भ देत राजनाथ सिंह यांनी ‘ते’ वक्तव्य केल्याचा दावा केला. त्यावर सलीम यांच्या दाव्यानुसार- ‘नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्याने आठशे वर्षांनंतर पहिल्यांदाच देशाला हिंदू शासक मिळाला’, असे वक्तव्य आपण केलेच नसल्याचे स्पष्टीकरण राजनाथ सिंह यांनी दिले. या आरोपामुळे वेदना झाल्या असून उलट असे वक्तव्य करणाऱ्या गृहमंत्र्यास पदावर राहण्याचा अधिकार नाही, असे राजनाथ सिंह यांनी सलीम यांना सुनावले.
सलीम यांनी ‘आऊटलूक’चा संदर्भ देऊन केलेल्या आरोपांना भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. सलीम यांनी राजनाथ सिंह यांना, तुम्हीच असे म्हटले नसल्याचे सिद्ध करा, असे प्रतिआव्हान दिले. त्यामुळे निर्माण झालेल्या प्रचंड गदारोळात लोकसभेचे कामकाज तीनदा तहकूब झाले. हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना चर्चेसाठी बोलावून नरेंद्र मोदी यांनी जीएसटीवर सहकार्य मागितले होते. याशिवाय असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर चर्चेची बिनशर्त तयारी सरकारने केली होती. त्यानुसार चर्चा सुरू झाली; परंतु या चर्चेला भलतेच वळण लागले. परस्पर आरोप-प्रत्यारोपांमध्ये असहिष्णुतेची चर्चा विरली. . सलीम केवळ ‘आऊटलूक’चा संदर्भ देत असल्याची पाठराखण सर्व विरोधक करीत होते. त्यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यात सलीम यांच्या- मला हवं तर फासावर लटकवा, या वाक्याने अधिकच भर पडली.

‘ते’ वक्तव्य सिंघल यांचे!

विश्व हिंदू परिषदेचे दिवंगत नेते अशोक सिंघल यांनीच- ‘आठशे वर्षांनी पृथ्वीराज चौहान यांच्यानंतर देशाला हिंदू (मोदींच्या रूपात) हिंदू शासक मिळाला आहे’, असे वक्तव्य केले होते. मात्र एका मॅगझिनमध्ये ते राजनाथ सिंह यांचे असल्याचे प्रसिद्ध झाले. त्याचाच संदर्भ देत मोहम्मद सलीम यांनी राजनाथ सिंह यांना लक्ष्य केले. गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दिल्लीत झालेल्या जागतिक हिंदू काँग्रेसमध्ये अशोक सिंघल यांनी भाषणादरम्यान हे विधान केले होते.

भाजप सदस्यांचा आक्षेप
सलीम यांनी ‘आऊटलूक’चा संदर्भ देऊन केलेल्या आरोपांना भाजप खासदारांनी जोरदार आक्षेप घेतला. खुद्द राजनाथ सिंह यांनी आपण असे वक्तव्य केले नसल्याचे ठोस प्रतिपादन करीत सलीम यांना धारेवर धरले.

सलीम यांच्यासाठी काँग्रेस-तृणमूल एकत्र
सलीम यांनी वक्तव्य मागे घेण्याच्या मागणीवर सत्ताधारी ठाम होते, तर सलीम यांच्या भाषणातील ‘तो’ भाग वगळण्याची सूचना लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केली. मात्र तरीही सत्ताधाऱ्यांचे समाधान झाले नाही. सलीम यांनी वक्तव्य मागे घ्यावे अथवा माफी मागावी, अशी मागणी संसदीय कामकाजमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी केली. त्यामुळे मोहम्मद सलीम यांच्यासाठी काँग्रेस व तृणमूल काँग्रेसचे सदस्य एकवटले

असहिष्णुतेऐवजी ‘त्या’ वक्तव्याभोवती चर्चा केंद्रित
नवी दिल्ली: असहिष्णुतेच्या मुद्दय़ावरील चर्चेला केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या कथित वक्तव्यामुळे भलतेच वळण लागले. माकपच्या मोहम्मद सलीम यांनी देशातील वाढत्या असहिष्णुतेच्या मुद्दय़ावर चर्चेस प्रारंभ केला. मात्र अवघ्या अध्र्या तासानंतर सत्ताधारी व विरोधकांची सहिष्णुतेची परीक्षाच सुरू झाली. ‘आऊटलूक’ मॅगझिनमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या आधारावर राजनाथ सिंह यांनी वादग्रस्त विधान केल्याचे सलीम म्हणाले. याचे जोरदार खंडन राजनाथ सिंह यांनी केले. सलीम यांच्या दाव्यानुसार- ‘शंभर वर्षांनी देशाला हिंदू शासक मिळाला आहे’, असे आपण कधीही बोललो नसल्याचे राजनाथ सिंह म्हणाले. त्यावर सलीम यांनी थेट संबंधित लेखातील परिच्छेदच वाचून दाखविला. संसदीय कामकाजमंत्री राजीव प्रताप रूडी यांनी सलीम यांनी स्वत:चे विधान मागे घ्यावे, अशी मागणी केली. त्यावर- सलीम यांचे वक्तव्य कामकाजातून वगळल्याचे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी स्पष्ट केले.
१८५७ – बंड नव्हे स्वातंत्र्यसमर!
लोकसभेत नियम १९३ अंतर्गत पी. करुणाकरन यांनी असिहष्णुतेवर चर्चेची नोटीस दिली होती. त्यानुसार मोहम्मद सलीम यांनी चर्चेस प्रारंभ केला. ‘हा देश कुणा एका धर्मीयाचा नाही. आपण सर्व जण इथे भाडेकरू आहोत’, या सलीम यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी खासदारांमध्ये खळबळ माजली.
सलीम यांनी १८५७ चा उल्लेख ‘गदर’ (बंडखोरी) असा केल्यानंतर खुद्द लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यास आक्षेप घेतला.