18 January 2019

News Flash

राहुल गांधी, पक्षाने ‘भगवा दहशतवाद’ असा शब्दप्रयोग कधीच केला नाही – काँग्रेस

भगवा किंवा हिंदू दहशतवाद असे शब्द काँग्रेसने कधी वापरलेलेच नाहीत. दहशतवादाचा कुठल्या एका धर्माशी किंवा समाजाशी संबंध जोडता येत नाही असे आमचे पूर्वीपासून मत आहे.

भगवा किंवा हिंदू दहशतवाद असे शब्द काँग्रेसने कधी वापरलेलेच नाहीत. दहशतवादाचा कुठल्या एका धर्माशी किंवा समाजाशी संबंध जोडता येत नाही असे आमचे पूर्वीपासून मत आहे. आमचे नेते राहुल गांधी किंवा पक्षाने कधीच असा शब्दप्रयोग केलेला नाही असा दावा काँग्रेसने केला आहे. भाजपाच्या आरोपावर काँग्रेस प्रवक्ते पी.एल.पुनिया यांनी हे स्पष्टीकरण दिले.

हा सर्व मूर्खपणा आहे. भगवा दहशतवाद वैगेरे असे काहीही नसते. दहशतवादाला तुम्ही कुठल्याही धर्माशी, समाजाशी किंवा जातीशी जोडू शकत नाही. ही एक गुन्हेगारी प्रवृत्ती आहे असे पुनिया म्हणाले. २००७ सालच्या मक्का मशीद बॉम्बस्फोट प्रकरणात असीमानंदांसह चार आरोपीची निर्दोष सुटका झाल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेसने भगवा दहशतवाद असा शब्दप्रयोग करुन हिंदुंची बदनामी केली होती त्यामुळे राहुल गांधींनी आता माफी मागितली पाहिजे अशी भाजपाने मागणी केली. भाजपाच्या या आरोपावर पत्रकारांनी पुनिया यांना विचारले असता काँग्रेसने भगवा किंवा हिंदू दहशतवाद असे शब्द कधी वापरलेच नाहीत असे त्यांनी उत्तर दिले.

हैदराबादमधील मक्का मशिदीत १८ मे २००७ रोजी नमाज सुरु असताना बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटांमध्ये ९ जणांचा मृत्यू झाला होता. तर ५८ जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर आंदोलन करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला होता. यात आणखी ५ जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात एकूण १६० साक्षीदार होते. हैदराबाद बॉम्बस्फोटांमध्ये १० आरोपी होते. हे सर्व जण अभिनव भारत या संघटनेशी संबंधित आहेत.

स्वामी असीमानंद, देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा उर्फ अजय तिवारी, भरत मोहनलाल रतेश्वर, राजेंद्र चौधरी व अन्य पाच जण या प्रकरणात आरोपी होते. तपास यंत्रणांनी स्वामी असीमानंदसह पाच जणांना अटक केली होती. यातील स्वामी असीमानंद व भरत भाई या दोघांची जामिनावर सुटका झाली होती. तर उर्वरित तीन आरोपी हैदराबादमधील कारागृहात आहेत. आरोपी रामचंद्र कालसांगरा आणि संदीप डांगे हे दोघे अजूनही फरार आहेत. आणखी एक आरोपी सुनील जोशीचा गोळीबारात मृत्यू झाला होता. तसेच तेजराम परमार आणि अमित चौहान या दोघांविरोधात अजूनही तपास सुरु आहे.

 

First Published on April 17, 2018 2:19 am

Web Title: never used saffron or hindu terror term congress