रिझर्व्ह बँकेकडून आता नव्या १०० रुपयांच्या नोटा चलनात येणार आहेत. मात्र, यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. पुढील वर्षी एप्रिलमध्ये या नोटांची छपाई सुरु करण्यात येणार आहे. बँकेच्या सूत्रांनी ही माहिती दिली.

देशात सर्वाधिक हाताळल्या जाणाऱ्या १०० रुपये किमतीच्या या नव्या नोटांची छपाई २०० रुपयांच्या नोटांची संपूर्ण छपाई झाल्यानंतर सुरु होणार आहे. मार्च अखेरपर्यंत २०० रुपयांच्या नोटांची छपाई पूर्ण होणार आहे.

नव्या १०० रुपयांच्या नोटा चलनात दाखल होणार असल्या तरी सध्या चलनात असलेल्या नोटाही चलनात कायम ठेवण्यात येणार आहेत. त्यानंतर कुठलीही चलनटंचाई निर्माण होणार नाही याची काळजी घेत हळूहळू या नोटा बाद करण्यात येतील, अशी माहिती रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

नव्या नोटेचा आकार आणि परिमाण यांच्यामध्येही बदल केला जाणार आहेत. त्याचबरोबर एटीएममध्ये या नोटा बसतील अशा पद्धतीने त्या छापण्यात येणार आहेत. सध्या देशभरातील एटीएममध्ये असणाऱ्या चार ट्रे पैकी एका ट्रेमधून १०० रुपयांच्या नोटा ठेवल्या जातात. येत्या सहा महिन्यांत २०० रुपयांच्या नोटा पुढील सहा महिन्यांपर्यंत चलनात आणण्यात येणार आहेत. २००० रुपयांची नोट चलनात दाखल झाल्यानंतर सुट्या पैशांची चणचण निर्माण झाली होती. त्यासाठी २०० रुपयांची नवी नोट जारी करण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर नोटा बदलण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता लोकांना नोटांची कसलीही कमतरता भासणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे.