News Flash

दहशतवादाविरोधात ‘तडाखेबंद’ सलामी..

गेल्या आठवडय़ात दहशतवाद्यांच्या हल्ल्याने रक्तबंबाळ होऊनही निर्धाराने उभ्या ठाकलेल्या ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाला बुधवारी वाचकांनी तडाखेबंद खपाची सलामी दिली!

| January 15, 2015 04:11 am

गेल्या आठवडय़ात दहशतवाद्यांच्या हल्ल्याने रक्तबंबाळ होऊनही निर्धाराने उभ्या ठाकलेल्या ‘शार्ली एब्दो’ या व्यंग्यचित्रसाप्ताहिकाला बुधवारी वाचकांनी तडाखेबंद खपाची सलामी दिली! दरमहा ६० हजारांचा खप असलेल्या या अंकाच्या छापल्या गेलेल्या ३० लाख म्हणजे पन्नासपट जास्त प्रती सूर्योदयानंतर काही तासांतच हातोहात संपल्या असून आणखी वीस लाख प्रतींची फेरछपाई सुरू आहे!
भीषण हल्ल्यानंतर प्रथमच प्रकाशित होत असल्याने ऐतिहासिक मूल्य लाभणारा हा अंक आपल्या संग्रही असावा आणि त्यायोगे आपण इतिहासाचा भाग बनावे या भावनेने जनमानस भारले होते. त्याचबरोबर दहशतवादाविरोधात निषेध नोंदवण्याचा हा एक मार्ग आहे, या विचाराने प्रेरित होऊनही लाखो लोकांनी हा अंक घेण्यासाठी पहाटेपासूनच वृत्तपत्रांच्या स्टॉलबाहेर रांगा लावल्या होत्या.
विशेष म्हणजे हा अंक केवळ फ्रेंचमधूनच नव्हे तर इंग्रजी, स्पॅनिश, इटालियन, अरबी आणि तुर्की भाषांतूनही प्रकाशित झाला आहे. पॅरिसच्या गॅम्बेटा मेट्रो स्थानकावरील एका वृत्तपत्र विक्रेत्या महिलेने सांगितले की, मी पहाटे पावणेसहा वाजता दुकान उघडले तेव्हा ६०-७० लोक रांगेत उभे होते. अवघ्या पंधरा मिनिटांत माझ्याकडच्या ४५० प्रती विकल्या गेल्या. असा अनुभव याआधी कधीही आला नव्हता.
प्रेषित महम्मद यांची व्यंग्यचित्रे छापण्याच्या परंपरेतून दहशतवाद्यांचे लक्ष्य ठरलेल्या या अंकाच्या मुखपृष्ठावरही प्रेषितांचेच व्यंग्यचित्र आहे. ‘मी शार्ली आहे..’ असा कागद हातात घेत अश्रू ढाळणाऱ्या प्रेषितांचे हे व्यंग्यचित्र वगळता अंकातील सर्व व्यंग्यचित्रे ही दहशतवाद्यांवर रेषेतून नेम धरणारी आहेत. अंकाच्या दुसऱ्या पानावर प्रकाशकांचे खास पत्र असून त्यात, शार्लीला लक्षावधी नवे मित्र मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला आहे.
दरम्यान, इबेवर तीन युरोचा हा अंक १५ हजार युरोला विकून अनेकांनी चांदी करून घेतली. विक्रेत्यांकडे प्रती उपलब्ध असताना त्यांनी काळाबाजार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इबेने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. रिपोर्ट्र्स विदाउट बॉर्डर्स या संस्थेने या प्रकाराबाबत संताप व्यक्त केला असून हा अवास्तव नफेखोरीचा प्रयत्न असल्याचे म्हणत आक्षेप घेतला आहे.
इराणकडून निषेध
शार्ली एब्दो या फ्रान्समधील व्यंगचित्र साप्ताहिकाच्या नव्या अंकाचा इराणने निषेध केला असून त्यातील व्यंगचित्रे इस्लाम व महंमद पैगंबराची निंदा करणारी असल्याचे म्हटले आहे. हा अंकच प्रक्षोभक असल्याचे इराणचे म्हणणे आहे. हा अंक मुस्लिमांच्या भावना दुखावणारा असला तरी संयम बाळगावा, असे आवाहन ब्रिटनमधील इमामांच्या संघटनेने केले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2015 4:11 am

Web Title: new charlie hebdo issue selling record high
टॅग : Charlie Hebdo
Next Stories
1 शार्ली एब्दो हल्ल्याची जबाबदारी अल कायदाची
2 गंगेत सापडलेल्या शेकडो मृतदेहांचे गूढ!
3 नक्वी यांना वर्षभराचा तुरुंगवास
Just Now!
X