चीनचा आडमुठेपणा कायम; आम्हाला दुबळे समजू नका-अरुण जेटलींचा इशारा

सिक्कीमलगतच्या सीमाभागात सुरू असलेल्या वादावरून चीनने आपला आडमुठेपणा कायम ठेवला आहे. सिक्कीममधील वादाबाबत भारताशी राजनैतिक पातळीवर चर्चा करण्याचा मार्ग अजूनही खुला आहे; परंतु भारतीय सैन्याने संबंधित भूभागातून माघार घेतली तरच ही चर्चा होऊ शकते, अशी अट चीनने घातली आहे.

डोकलाम भागात चिनी सैन्याने सुरू केलेल्या रस्तेबांधणीला भारतीय लष्कराने जोरदार आक्षेप घेतला. त्यावरून उभय देशांतील सैन्यांत १८ जूनला वाद झाला. डोकलामवर आपलाच हक्क असल्याचा चीनचा दावा आहे, तर या भागात चीनने घुसखोरी केल्याचा भारताचा आरोप आहे. यावरून उभय देशांत वाद निर्माण झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी प्रथमच वक्तव्य करताना परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात संबंधित पक्षांनी संयम बाळगणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले. द्विपक्षीय समझोत्यांचे पालन करून जैसे थे परिस्थिती एकतर्फी बदलता कामा नये, असे चीनच्या भूमिकेवर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. भारत व चीन यांच्या दरम्यान विशेष प्रतिनिधी प्रक्रियेत मतैक्य झाले होते, त्याचा दोन्ही देशांनी आदर राखावा. चीनच्या कृतीबाबत आम्हाला चिंता वाटत असून चिनी सरकारने सिक्कीममधील भागात रस्तेबांधणी सुरू करून समझोत्याचा भंग केल्याचे भारताने स्पष्ट केले.

१६ जूननंतरचा घटनाक्रम पाहिला, तर पीपल्स लिबरेशन आर्मीचे जवान डोकलाम भागात रस्तेबांधणीसाठी आले होते. भूतान सरकारच्या मदतीने भारतीय अधिकाऱ्यांनी चिनी बांधकाम पथकाशी संपर्क साधला व जैसे थे परिस्थिती राखण्यास सांगितले.

भारत व भूतान यांच्यात नेहमीच सल्लामसलत होत आली आहे, त्यानुसार भूतान व भारत त्यानंतर एकमेकांच्या संपर्कात होते. सिक्कीम भागातील सीमेच्या संदर्भात सांगायचे तर २०१२ मध्ये परस्पर सामंजस्याचा करार झाला होता. त्यानंतर विशेष प्रतिनिधी पातळीवर बैठक झाली होती. भूतानच्या लष्कराने संबंधित रस्ते बांधणी करणाऱ्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. भूतानच्या राजदूतांनीही चीन सरकारचा त्यांच्या नवी दिल्लीतील दूतावासामार्फत २० जूनला निषेध केला होता.

चीनने तणाव वाढवला

२०१७ मध्ये भारत १९६२ सारखा राहिलेला नाही. इतक्या वर्षांत परिस्थितीत बराच बदल झाला आहे, असा इशारा संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी चीनला दिला आहे. वादग्रस्त प्रदेश भूतानचा आहे. भूतानला सुरक्षा प्रदान करण्याचा भारताने करार केला आहे. भूतान सरकारने या प्रकरणी पत्रक जारी करून भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र चीन विनाकारण तणाव वाढवत आहे, असे जेटली यांनी एका मुलाखतीत म्हटले. तसेच भारत आता  प्रबळ झाला आहे असा इशाराही दिला आहे.