काँग्रेसमध्ये ‘सोनिया पर्व’ संपले आणि राहुल ‘युगा’ची सुरूवात झाली आहे. तब्बल १९ वर्षे पक्षाची धुरा सांभाळल्यानंतर शुक्रवारी सोनिया गांधी यांनी अध्यक्षपदाची सुत्रे राहुल गांधींकडे सोपवली. ‘न्यूज १८’ च्या वृत्तानुसार जुन्या अध्यक्षांच्या पायउतारानंतर राहुल यांच्याकडे आपली एक खास टीम आहे, जी त्यांना कामकाजात मदत करेल. आज त्याच टीमबाबत जाणून घेऊयात..

कौशल के. विद्यार्थी: जर एखाद्याला राहुल यांच्याशी किंवा राहुल यांना एखाद्याशी बोलायचं म्हटलं तर तो मार्ग कौशल यांच्या माध्यमातूनच जातो. जनतेशी संपर्क वाढवण्यात कौशल महत्वाची भूमिका निभावू शकतात, असा राहुल यांना विश्वास आहे. परंतु, जेव्हा पक्षाला काही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला, तेव्हा कौशल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना टीकेचा सामना करावा लागला. कौशल आणि त्यांच्या टीमला प्रत्यक्षातील राजकारणाचा अभाव असल्याची टीका सहन करावी लागली.

कनिष्क सिंह: वर्ष २००३ मध्ये शीला दीक्षित यांच्या निवडणूक प्रचारात सहभागी होऊन कनिष्क सिंह राजकारणात आले. त्यांनी न्यूयॉर्कमधील आपली नोकरी सोडून काँग्रेसचे कार्य सुरू केले. वर्ष २००४ मध्ये त्यांचा एक लेख आऊटलुकमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर सर्वांचे त्यांच्याकडे लक्ष गेले. २००४ मध्ये काँग्रेसचा विजय होईल, ही भविष्यवाणी केल्यानंतर राहुल गांधी यांचे ते निकटवर्तीय झाले.

के बी बायजू: त्यांनी वर्ष २०१० मध्ये एसपीजी (विशेष सुरक्षा दल) अधिकारीपदाची नोकरी सोडली. आता ते राहुल गांधी यांची सुरक्षा पाहतात. बायजू ट्विटरवरही सक्रीय आहेत. ट्विटच्या माध्यमातून ते नरेंद्र मोदी आणि भाजपवर नेहमी टीका करत असतात. त्याचबरोबर लॉजिस्टिक्स आणि माध्यमाचा कार्यभारही सांभाळतात.

अलंकार सावई: आयसीआयसीआय बँकेचे माजी कर्मचारी असलेले अलंकार हे राहुल यांचे डॉक्युमेंटेशन आणि रिसर्चचे प्रभारी आहेत. ते आणि कौशल विद्यार्थी दिल्लीबाहेरील राहुल यांच्या प्रत्येक दौऱ्यात बरोबर असतात. ते दिव्या स्पंदा यांच्याबरोबर राहुल गांधींच्या सोशल मीडियाचा कार्यभारही सांभाळतात.

सचिन राव: मिशिगन बिझनेस स्कूलमधून कॉर्पोरेट स्ट्रॅटजी अँड इंटरनॅशनल बिझनेसमधून सचिन राव यांनी एमबीए केले आहे. ते युवा काँग्रेस आणि एनएसयूआय संघटनेचे काम ही पाहतात.