‘सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या करोना विषाणूचं नवीन रुप मुलांसाठी खूप घातक असल्याचं सांगितलं जात आहे,’ असं म्हणत यामुळे करोनाची तिसरी लाट येण्याचा इशारा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला दिला होता. केजरीवाल यांनी एक ट्विट करून याकडे केंद्राचं लक्ष वेधलं होतं. तसेच सिंगापूर-भारत हवाई वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणीही केली होती. केजरीवाल यांनी केलेल्या ट्विटवर थेट सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने उत्तर देत कोविडचा नवीन स्ट्रेन भारतातीलच असल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी एक ट्विट करत केंद्र सरकारचं एका मुद्द्याकडे लक्ष वेधलं होतं. सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन विषाणू आढळून आला असून, तो लहान मुलांसाठी घातक असल्याचं सांगण्यात येत आहे, असं म्हणत केजरीवालांनी सिंगापूरसोबतची हवाई वाहतूक तत्काळ बंद करण्याची मागणी केली होती. केजरीवाल यांच्या ट्विटवर सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने ट्विट करून उत्तर दिलं आहे.

आणखी वाचा- लहान मुलांवर करोनाचं सावट; ‘झोपेतून जागे व्हा…’ काँग्रेस नेते राहुल गांधींचा सरकारला इशारा

केजरीवाल यांचं ट्विट रिट्विट करत सिंगापूर दूतावासाने कोविडच्या नव्या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “सिंगापूरमध्ये कोविडचा नवीन स्ट्रेन आढळून आल्याच्या दाव्यात कोणतंही तथ्य नाही. गेल्या काही आठवड्यांमध्ये सिंगापूरमध्ये आढळून आलेल्या मुलांसहित अनेक रुग्णांना बी.१.६१७.२ कोविड विषाणूंचा संसर्ग झाला आहे. फिलोजेनेटिक चाचणीतून हे सिद्ध झालं आहे. या विषाणूची निर्मिती भारतातच झालेली आहे,” असं सिंगापूरच्या भारतातील दूतावासाने म्हटलं आहे.

आणखी वाचा- मृत्यूचं थैमान! देशात करोनाबळींचा नवा उच्चांक; २४ तासांत २,६७,३३४ आढळले पॉझिटिव्ह

ट्विट करून केजरीवाल नेमकं काय म्हणाले होते?

करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी जीवघेणा असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी एक ट्विट केलं होतं. “सिंगापूरमध्ये आढळून आलेला करोनाचा नवीन स्ट्रेन लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचं सांगितलं जात आहे. भारतात हा विषाणू तिसऱ्या लाटेच्या रुपात येऊ शकतो. केंद्र सरकारला माझी विनंती आहे, की, सिंगापूरसोबतची हवाई प्रवासी सेवा तत्काळ रद्द करण्यात यावी. लहान मुलांसाठी लसींच्या पर्यायांवर प्राधान्यक्रमाने काम करण्यात यावं,” असं केजरीवाल म्हणाले होते.