पाकिस्तानात आजवर कधीही झालेला नाही असा एक विचित्र पेचप्रसंग निर्माण झाला आहे. जगात गव्हाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर असलेल्या या देशातच गव्हाच्या पीठाचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे लोकांना पोळ्या आणि नान खाणे अवघड बनले आहे. बाजारातून गव्हाचे पीठ हा दररोजच्या जेवणातील महत्वाचा घटक गायब झाल्याने पाकिस्तानी जनतेच्या तोंडचे पाणीच पळालं आहे. बलुचिस्तान, सिंध, पंजाब आणि खैबर पख्तुन्वा या सर्व चार प्रांतांमध्ये ही समस्या निर्माण झाली आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, पाकिस्तानातील लोक पोळी आणि नानसाठी अक्षरशः तळमळत आहेत. या पेचप्रसंगासाठी सर्व प्रांतांमधील सरकारे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत. या स्थानिक सरकारांकडून जनतेला दररोजच्या जेवणात मुख्यत्वे तांदळाचा वापर करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पाकिस्तानातील प्रमुख वृत्तपत्र असलेल्या डॉनमधील वृत्तानुसार, पाकिस्तानत गेल्या अनेक महिन्यांपासून गव्हाच्या पीठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, गेल्या रविवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सर्व प्रातांच्या सरकारांना महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे आणि साठेबाजांवर कारवाईचे आदेश दिले तेव्हापासून या समस्येने गंभीर स्वरुप प्राप्त केले आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील नानबाईंनी (नान बनवणारे आणि विक्री करणारे) गव्हाचे पीठ उपलब्ध नसल्याने सध्या नान बनवणे थांबवले आहे. त्यामुळे नान बनवणाऱ्या विविध दुकानांच्या संघटनांनी स्थानिक आणि केंद्र सरकारविरोधात मोहिमा सुरु केल्या आहेत. यामध्ये खैबर पख्तुन्वा प्रांतात सर्वाधिक गव्हाच्या पीठाचा तुटवडा निर्माण झाला आहे. या प्रांतात २५०० हून जास्त नानबाई राहतात. कारण इथले रहिवासी दुकानातून नान खरेदी करण्यास प्राधान्य देतात. यांपैकी आता बरीच दुकाने बंद झाली आहेत.

पाकिस्तानातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पाकिस्तानात निर्माण झालेली गव्हाच्या पीठाच्या तुटवड्याची समस्या तेव्हाच नियंत्रणात येईल, जेव्हा २० मार्चपर्यंत सिंध आणि १५ एप्रिलपर्यंत पंजाब प्रांतात नवे गव्हाचे पीक काढले जाईल.

पाकिस्तानातील या समस्येवरुन पाकिस्तान मुस्लिम लीगचे अध्यक्ष आणि संसदेतील विरोधीपक्ष नेते नवाज शरीफ यांनी इम्रान खान सरकारवर टीका केली आहे. तसेच पाकिस्तान पिपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो-झरदारी यांनी देखील या समस्येसाठी इम्रान खान सरकारलाच जबाबदार धरले आहे. पाकिस्तानने ४०,००० टन गव्हाचे पीठ अफगाणिस्तानला निर्यात केल्याने ही समस्या निर्माण झाल्याचा आरोप भुट्टो यांनी केला आहे.