पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांची चेन्नईमध्ये दुसऱ्यांदा अनौपचारिक चर्चा झाली त्यानंतर द्विपक्षीय संबंधांना नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे. व्यापारासह विविध क्षेत्रांमध्ये बारत-चीन संबंध अधिक दृढ करण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.

चेन्नईमध्ये दोन्ही नेत्यांची भेट झाल्यानंतर जवळपास एका महिन्याच्या कालावधीनंतर दोन्ही नेत्यांची ब्रिक्स परिषदेत भेट झाली. जिनपिंग यांना पुन्हा एकदा भेटून आनंद झाल्याचे मोदी यांनी ट्वीट केले आहे. ब्राझीलमध्येच आपण प्रथम भेटलो होतो, तेव्हा आपण अपरिचित होतो, मात्र अपरिचितांच्या प्रवासाचे आता घनिष्ठ मैत्रीत रूपान्तर झाले आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.

चेन्नईतील आपल्या भेटीमुळे आपल्या प्रवासाला नवी दिशा आणि नवी ऊर्जा मिळाली आहे, आपण एकमेकांच्या आणि जागतिक प्रश्नांवर चर्चा केली आणि ती यशस्वी झाली, असे मोदी यांनी म्हटले आहे. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय प्रश्नांवर व्यापक चर्चा केली. दहशतवादाचा संयुक्तपणे मुकाबला करण्याचे, द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक आदींबाबत चर्चा केली.

भारताने आरसेपमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दोन्ही नेत्यांची भेट झाली. प्रस्तावित करार भारतीयांच्या हिताचा नसल्याचे कारण देऊन भारताने त्यामधून माघार घेतली होती.