जगभरामध्ये करोनामुळे भितीचे वातावरण असतानाच आफ्रिकेमध्येही करोनामुळे सहा हजारहून अधिक जणांना प्राण गमावावे लागले आहेत. अशाच आता आफ्रिकेमधील काँगो देशात ‘इबोला’ या घातक विषाणूचा संसर्गाची झाल्याची नवीन सहा प्रकरणे समोर आली आहेत. या सहा जणांपैकी चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. हा काँगोमधील इबोलाचा ११ वा उद्रेक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेनं एक पत्रक जारी केलं आहे.

एप्रिल महिन्यामध्येच येथील  बेनी शहरात इबोलामुळे दोघांचा मृत्यू झाला होता. असं असतानाच आता या ठिकाणापासून जवळजवळ हजार किलोमीटर दूर असणाऱ्या ठिकाणी म्हणजेच म्बानडाका शहरामध्ये इबोलाचे रुग्ण अढळून आले आहेत. त्यामुळे या विषाणूने एवढा लांब पल्ल्यावरील अंतर कसे कापले यासंदर्भात तर्क वितर्क मांडले जात आहेत. आता हे इबोलाचे नवे केंद्र असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कांगो चे आरोग्यमंत्री एटेनी लोंगोंडो यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रभावित भागामध्ये डॉक्टरांचे विशेष पथक आणि औषधांचा साठा पाठवण्यात आला आहे. लोगोंडो यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.

एप्रिल महिन्यामध्ये काँगोमध्ये २० महिन्यांच्या इबोलाविरोधात मोहीमेनंतर इबोलामुक्तीची घोषणा करण्यात येणार होती. मात्र त्याच्या तीन दिवस आधीच देशामध्ये इबोलाची नवीन प्रकरणे आढळून आली. त्यामुळेच ही २० राबवूनही त्याचा फारसा उपयोग झालेला नाही. १३ एप्रिल रोजी काँगोमध्ये इबोला विषाणूजन्य तापाची दहावी साथ संपल्याचे जाहीर करण्याची तयारी जागतिक आरोग्य संघटनेने केली होती. मात्र १० एप्रिल रोजी २६ वर्षीय पुरुषाचा आणि १२ एप्रिल रोजी एक तरुण मुलीचा मृत्यू झाल्याचे इबोलामुक्तीचे स्वप्न भंगले.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेडोस अधानन घेब्रेसस यांनी इबोलासंदर्भात बोलताना, “मानवासमोर केवळ करोना हे एकमेव आरोग्य संकट नसल्याचा हा इशारा आहे. करोनाच्या साथीवर आमचे लक्ष आहेच. मात्र त्याचवेळी इतर आरोग्य संकटांकडेही आम्ही लक्ष ठेऊन आहोत,” असं सांगितलं.

इबोला म्हणजे नक्की काय?

१९७०च्या दशकात  ‘इबोला’चा पहिला रुग्ण सापडला होता. ‘इबोला’मुळे अंतर्गत रक्तस्राव होऊन ताप येत असतो. बेल्जियन वैज्ञानिकांनी काँगोतील झैरेत अनेक लोक मृत्युमखी पडल्याचा शोध घेतला असता त्यांना त्यांच्यात ‘इबोला’चे अस्तित्व सापडले होते. त्या भागातील नदीवरून या विषाणूला ‘इबोला’ हे नाव देण्यात आले होते. हा विषाणू वटवाघळात सापडतो. पण वटवाघळांना त्यामुळे काही होत नाही ज्या लोकांना संसर्ग होतो ते मात्र तापाने आजारी पडतात.

माकडे, काळविटे त्याने संसर्गित होतात. त्यांच्यातूनही हा विषाणू माणसात येतो. विषाणूचे झैरे, सुदान, बुंडीबुग्यो, रेस्टन व ताइ फॉरेस्ट असे प्रकार आहेत. ताप, स्नायूदुखी, उलटय़ा, अतिसार, मूत्रपिंड व यकृत निकामी होणे, अंतर्गत व बा रक्तस्राव अशी लक्षणे असतात.