संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात भाषेचा मुद्दा चुकीच्या पद्धतीने हाताळला अशी टीका नव्याने नियुक्त करण्यात आलेले गोवा विभाग संघचालक लक्ष्मण बेहरे यांनी केली आहे. राजकारणी म्हणून पर्रिकर यशस्वी असले, तरी भाषेच्या मुद्दा त्यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच नीट हाताळायला हवा होता, असे बेहरे यांनी फोंडा येथे वृत्तसंस्थेशी बोलताना स्पष्ट केले.

संघ कोणा स्वयंसेवकाला एखाद्या राजकीय पक्षाला किंवा अगदी भाजपलादेखील मतदान करण्यास सांगत नाही. मात्र जास्तीत जास्त मतदान व्हावे व चांगल्या व्यक्ती निवडून याव्यात असा आमचा आग्रह असतो, असे बेहरे यांनी सांगितले.

भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या कार्यात अधिक योगदान देता यावे म्हणून सुभाष वेलिंगकर यांना  संघचालकपदावरून मुक्त करण्यात आल्याचा दावाही बेहरे यांनी केला. ४७ वर्षे संघाशी निगडित असल्याने गोवा संघचालकपदाची धुरा सोपवण्यात आल्याचे बेहरे यांनी सांगितले. मातृभाषेतून शिक्षण द्यावे ही मागणी भाजप सरकारने पूर्ण करायला हवी, अशी सूचना बेहरे यांनी केली. भारतीय भाषा सुरक्षा मंचने राजकारणात उतरण्याचे जाहीर केल्यानंतर संघाने  वेलिंगकर यांना  गोवा संघचालकपदाच्या जबाबदारीतून मुक्त केले होते.