केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजधानी दिल्ली आणि मुंबईला जोडणारा नवीन एक्स्प्रेस वे पुढील ३ वर्षांत बांधणार असल्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पासाठी एक लाख कोटी रुपये खर्च येणार आहे. दिल्लीतील एका खासगी कार्यक्रमात बोलताना त्यांनी याबाबत माहिती दिली. दिल्ली-गुरुग्राम-मेवात, कोटा अलवर-सवाई माधोपुर-बडोदाच्या मार्गे मुंबईपर्यंत हा एक्सप्रेस वे असेल असा अंदाज आहे.

हा एक्सप्रेस-वे झाल्यानंतर दिल्ली-मुंबई या दोन्ही महानगरांमधील अंतर निम्म्यावर येणार आहे. या प्रवासासाठी सध्या १४५० किमी अंतर कापावं लागतं पण एक्सप्रेस-वे झाल्यानंतर हे अंतर १२५० किमी होणार आहे. त्यामुळे सध्या २४ तासांचा वेळ लागणारा हा प्रवास एक्सप्रेस वेमुळे १२ तासांवर येईल असं वृत्ता टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. त्याचबरोबर चंबळ एक्सप्रेस वे तयार करुन तो मुंबई-दिल्ली एक्सप्रेस वेला जोडणार असल्याचंही गडकरींनी सांगितलं. या एक्सप्रेस वेमुळे मध्यप्रदेश, राजस्थान राज्यातील अनेक दुर्गम किंवा आदिवासी भाग जोडले जातील, त्यामुळे या भागांचा मोठा विकास होईल असंही गडकरी म्हणाले.

नवीन दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे हा ग्रीनफील्ड मार्ग असेल आणि तुलनेने कमी विकसित असलेल्या प्रदेशातून जाईल, अशी माहिती गडकरी यांनी याआधी दिली होती.