‘नवीन हज धोरण’ याच महिन्यात प्रसिद्ध् केले जाईल असे केंद्रीय अल्पसंख्यक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटले आहे. मुंबईत हज हाऊस येथे हज यात्रेच्या आढावा बैठकीला आणि प्रशिक्षण शिबिरादरम्यान ते बोलत होते. पुढील वर्षापासून नव्या हज धोरणानुसार हजयात्रेचे आयोजन केले जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

नवीन हज धोरण आखण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात असून लवकरच तो प्रसिद्ध केला जाईल असेही नख्वी यांनी यावेळी सांगितले. नवीन हज धोरणाचा उद्देश हजची संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक बनवणे आहे. नवीन हज धोरणात हज यात्रेकरूंना सागरी मार्गाने पाठवण्याचा पर्याय समाविष्ट असून यामुळे हजयात्रेचा खर्च निम्म्याने कमी होईल असे ते म्हणाले.

नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली २८ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नक्वी यांच्या म्हणण्यानुसार, भाविकांना आधुनिक जहाजांतूनही प्रवास करता येणार आहे. यामधून ४ ते ५ हजार लोकांना एकाच वेळी नेण्यात येणार आहे. मुंबई ते जेद्दाह हे तब्बल ४ हजार २६० किमी अंतर कापून हे जहाज दोन ते तीन दिवसांत भाविकांना इच्छित स्थळी पोहोचवणार आहे. पूर्वीच्या जहाजांसाठी या प्रवासाला १२ ते १५ दिवस इतका कालावधी लागत होता.

२८ ऑगस्ट रोजी दिल्लीत नौवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सौदी अरेबियाच्या सरकारसोबत भारतातील हज यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या समुद्र मार्गाबाबत महत्वपूर्ण चर्चा होणार आहे.