News Flash

महाराष्ट्रात नवे गृहमंत्री?

दिल्लीत शरद पवार- अनिल देशमुख भेटीमुळे तर्कवितर्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून ‘प्रशस्तीपत्रक’ मिळाल्यानंतर, चार दिवसांतच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शुक्रवारी दिल्लीत येऊन पवारांशी दोन तास चर्चा केली. या भेटीमुळे राज्याच्या गृहखात्याच्या मंत्रिपदाच्या संभाव्य बदलाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या स्फोटकांच्या चौकशीप्रकरणी राज्याच्या गृहखात्याने योग्य कारवाई केल्याचे सांगत पवार यांनी अनिल देशमुख यांची पाठराखण केली होती. त्यानंतरही देशमुखांना पवार यांची दिल्लीत येऊन भेट घ्यावी लागली आहे. मिहान प्रकल्पातील उद्योगांसंदर्भात चर्चा करण्यासाठी आपण शरद पवार यांची भेट घेतल्याचे सांगत देशमुख यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना बगल दिली. पण या भेटीमुळे पवारांनी देशमुखांच्या गृहखात्याच्या कारभाराचा ‘आढावा’ घेतल्याचे सांगितले जाते.

स्फोटकांचे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) देण्यात आले असून तपासात राज्य सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. ‘एनआयए’चा अहवाल आल्यानंतरच या प्रकरणावर अधिक भाष्य करणे उचित राहील, असे देशमुख म्हणाले. परमवीर यांच्याकडून काही चुका झाल्या असल्यामुळे त्यांची बदली करण्यात आल्याचे देशमुख यांनी सांगितले होते.

निलंबित साहाय्यक निरीक्षक सुनील वाझे यांच्या अटकेनंतर, त्यांच्या राज्य सरकारमधील ‘सूत्रधारां’ची चौकशी करण्याची मागणी करत भाजपने महाविकास आघाडीवरील दबाव वाढवला आहे. या पार्श्वभूमीवर देशमुखांकडून गृहमंत्रिपदाची जबाबदारी अन्य वरिष्ठ नेत्यांकडे देण्याची चर्चा तीव्र झाली आहे. मात्र राज्य मंत्रिमंडळात तात्काळ बदलाची शक्यता दिल्ली दौऱ्यावरील ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळली.

दिल्लीतील घडामोडी

* संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार दिल्लीत आहेत. त्यांच्या ‘६-जनपथ’ या निवासस्थानी काही दिवसांमध्ये राज्यातील नेत्यांच्या गाठीभेटी वाढल्या आहेत.

* केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या भेटीसाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे दिल्लीत आले होते. वेळेअभावी हर्षवर्धन यांच्याशी टोपेंची भेट झाली नाही.

* पी. सी. चाको यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाआधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पवार यांच्याशी तासभर चर्चा केली होती.

* राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही पवारांची भेट घेतली होती. विधानसभाध्यक्षपदाच्या नियुक्तीचा मुद्दाही चर्चेत असून काँग्रेसचे नेते काँग्रेस नेतृत्वाच्या भेटीसाठी दिल्लीवारी करत आहेत.

* भाजपचे खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिले असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 20, 2021 12:27 am

Web Title: new home minister in maharashtra abn 97
Next Stories
1 मराठा आरक्षण : इंद्रा सहानी निकालाच्या फेरविचाराची वेळ
2 ‘नवकरोनामुळे कोव्हॅक्सिनमध्ये बदलाची गरज नाही’
3 व्हॉट््सअ‍ॅपला रोखण्याची केंद्राची न्यायालयात मागणी
Just Now!
X