प्राप्तिकर विवरण पत्राचा नवीन अर्ज नमुना करदात्यांची कसोटी पाहणारा!

आर्थिक वर्षांच्या प्रारंभी प्राप्तिकर विवरण पत्राचा नवीन अर्ज आणण्याचा प्रघात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यंदाही पाळताना, २०१८-१९ कर निर्धारण वर्षांसाठी नवीन ‘सहज’ नावाचा अर्ज नमुना प्रस्तुत केला आहे. गुरुवारी हा अर्ज नमुना अधिसूचित करण्यात आला. नाव जरी ‘सहज’ असले तरी पगारदारांसाठी हे विवरण पत्र भरण्याचे काम मात्र आणखीच अवघड बनेल, असे दिसून येत आहे.

विशेषत: पगारदार वर्गाला नवीन प्राप्तिकर विवरण पत्र – ‘आयटीआर १’ भरताना, त्यांच्या वेतन उत्पन्नाचा खंडवार खुलासा करणे भाग ठरेल. नियोक्त्याद्वारे कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या ‘फॉर्म १६’मध्ये करदात्यासंबंधी अनेक तपशील असतात, विवरण पत्र भरताना त्यांचा उल्लेख आजवर स्वतंत्रपणे करण्याची गरज नसते. परंतु नव्या अर्ज नमुन्यात मात्र वजावटीस पात्र नसलेल्या भत्त्यांचा तपशील, करपात्र आणि करमुक्त वेतनेतर लाभ, वेतनाव्यतिरिक्त अन्य स्रोतातून मिळविलेला नफा यांचा तपशील देणे आवश्यक ठरेल.

गेल्या वर्षी एका पानाच्या ‘आयटीआर-१’ अथवा सहज अर्ज हा ५० लाखांपर्यंत उत्पन्न आणि एकच निवासी मालमत्ता असलेल्या पगारदार करदात्यांसाठी नव्याने प्रस्तुत करण्यात आला होता. तथापि, नोटबंदीच्या काळात बँक खात्यात जमा केलेल्या रोख ठेवींचा तपशील या अर्जात देणे करदात्यांसाठी अतिरिक्त केले गेले होते.

गेल्या वर्षी सुमारे तीन कोटी करदात्यांकडून या अर्जाद्वारे विवरणपत्र भरले गेले होते. यंदा ही उत्पन्न मर्यादा कायम असली, तर अनिवासी भारतीयांना ‘आयटीआर-१’ ऐवजी आयटीआर-२ या अतिरिक्त माहितीची मागणी करणारा नवीन अर्ज भरावा लागेल. एकूणात ‘फॉर्म १६’मध्ये तसेच मूळ स्रोतांतून करकपातीचा तपशील ‘फॉर्म २६ एएस’मध्ये नोंद असलेली माहिती पुन्हा विवरण पत्र अर्जात भरणे करदात्यांना भाग पडणार आहे. लघुउद्योजक आणि व्यावसायिक यांना याच पद्धतीने विवरण पत्र भरताना, जीएसटी आयएन क्रमांक आणि वस्तू व सेवा कर प्रशासनाकडे नोंद केलेल्या व्यावसायिक उलाढालीची आकडेवारी विवरण पत्र भरताना पुन्हा भरणे भाग ठरणार आहे.