प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजअंतर्गत करोनायोद्ध्यांचे विमाविषयक सर्व दावे २४ एप्रिलपर्यंत निकाली काढण्यात येतील व त्यानंतर त्यांना नवी विमा पॉलिसी देण्यात येईल, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले.

नव्या धोरणात ‘करोनायोद्ध्यांना’ संरक्षण दिले जाईल. यासाठी मंत्रालयाची न्यू इंडिया अ‍ॅश्युअरन्स कंपनीसोबत बोलणी सुरू आहेत, असे मंत्रालयाने एका ट्वीटमध्ये सांगितले. ‘विमान कंपनीने आतापर्यंत २८७ दाव्यांची रक्कम दिलेली आहे. कोविड-१९ शी लढा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे नीतीधैर्य उंचावण्यात या योजनेने महत्त्वाची अशी मानसशास्त्रीय भूमिका बजावली आहे’, असे मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधील (पीएमजीकेपी) करोनायोद्ध्यांच्या विमा पॉलिसींच्या दाव्यांचा २४ एप्रिल २०२१ पर्यंत निपटारा करण्यात येईल व त्यानंतर करोनायोद्ध्यांसाठी नवी विमा पॉलिसी अंमलात येईल, असेही मंत्रालयाने सांगितले.

पीएमजीकेपी गेल्या वर्षी मार्चमध्ये जाहीर करण्यात आले होते व त्याला २४ एप्रिलपर्यंत तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली, याचाही मंत्रालयाने उल्लेख केला. कोविड-१९ च्या दिवसांमध्ये करोनायोद्ध्यांबाबत काही विपरीत घडल्यास त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली जावी यासाठी त्यांना संरक्षक कवच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ते सुरू करण्यात आले होते. या योजनेंतर्गत करोनायोद्ध्यांना ५० लाखांचे विमा संरक्षण देण्यात येते.