देशात नवा मोटार वाहन कायदा लागू झाल्यापासून दंडाच्या भरघोस रक्कमेमुळे चर्चेचा विषय ठरला आहे. लाखो रुपयांचा दंड चालकांकडून आकारला जात असल्याची चर्चा असतानाच आता गुजरातमधून वेगळाच प्रकार समोर आला आहे. यामुळे पोलीस देखील हैराण झाले.

सोमवारी(दि.16) गुजरातमधील छोटा उदयपूर येथे वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची कारवाई सुरू होती. त्यानुसार दुचाकीवरुन जाणाऱ्या व हेल्मेट न घातलेल्या झाकीर मेमन नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी थांबवलं. पण त्याची अडचण ऐकून पोलिस देखील गोंधळले. न्यूज 18 च्या वृत्तानुसार, “माझ्या डोक्याच्या आकाराचं एकही हेल्मेट शहरात उपलब्ध नाही”, असं त्याने पोलिसांना सांगितलं.
“मी कायद्याचा आदर ठेवणारा व पालन करणारा व्यक्ती आहे, नियमांचं उल्लंघन करायला मला आवडत नाही. शहरात हेल्मेटची विक्री करणाऱ्या सर्व दुकानांमध्ये मी विचारणा केली, पण माझ्या डोक्याच्या आकाराचं एकही हेल्मेट कुठेच उपलब्ध नाही. इतर आवश्यक सर्व कागदपत्र माझ्यासोबत बाळगतो, पण हेल्मेटच्या बाबतीत माझ्याकडे काहीच पर्याय नाहीये. मी माझ्या अनोख्या अडचणीबाबत पोलिसांना सांगितलं”, अशी प्रतिक्रिया झाकीर यांनी दिली आहे.

आणखी वाचा : तरुणीने झोपेत गिळली साखरपुड्याची अंगठी, असा लागला शोध!

छोटा उदयपूरमधील बोडेली येथे झाकीर यांचं फळांच्या विक्रीचं दुकान आहे. ते दुचाकीवरुन घराबाहेर पडल्यानंतर वाहतूक पोलिसांच्या आणि दंडाच्या भीतीने त्यांचे कुटुंबीय नेहमी चिंतेत असतात. “ही अनोखी अडचण आमच्यासमोर आली. पण त्याची समस्या समजून घेऊन आम्ही त्याच्याकडून दंड आकारला नाही. तो कायद्याचं पालन करणारा व्यक्ती असून इतर सर्व कागदपत्रे त्याच्याकडे आहेत. अडचण समजून आम्ही त्याला दंड माफ केला”, अशी माहिती बोडेली शाखेचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक वसंत राठवा यांनी दिली.