अमेरिकेतील न्यू ऑर्लिअन्समध्ये एका सांगितिक व्हिडीओचे चित्रीकरण करण्यासाठी जमलेल्या नागरिकांवर काही अज्ञात समाजकंटकांनी केलेल्या अंदाधुद गोळीबारात १६ जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. न्यू ऑर्लिअन्समधील बनी फ्रेंड पार्कमध्ये स्थानिक वेळेनुसार रविवारी संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
या कार्यक्रमासाठी ३०० हून अधिक नागरिक बागेमध्ये जमले होते. त्याचवेळी एकापेक्षा जास्त लोकांनी गोळीबार केल्याचे न्यू ऑर्लिअन्सचे पोलीस अधीक्षक मायकल हॅरिसन यांनी सांगितले. जखमी नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती घटनास्थळी मृत पावलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम सुरू असताना अचानकच गोळीबार सुरू झाल्यामुळे अनेक लोक गोंधळून गेले. काही जण परिस्थिती समजून पटकन खाली बसल्याने त्यांना गोळ्या लागल्या नाहीत, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. चंदेरी रंगाच्या मशीनगनमधून एक व्यक्ती गोळीबार करीत असल्याचे काही जणांनी पाहिले. त्याचवेळी इतर ठिकाणांहून गोळीबार झाल्याचे काही जणांनी सांगितले.
टेलर गॅम्बल यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन गटांमधील पूर्ववैमनस्यातून त्यांनी घटनास्थळी एकमेकांवर गोळीबार केला. यामध्ये काही निरपराध व्यक्तीही जखमी झाल्या. गोळीबारानंतर दोन्ही गटाची लोके घटनास्थळावरून पसार झाली.