पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज दिल्लीमध्ये नवीन संसद भवानच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पंतप्रधानांनी दिलेल्या भाषणामध्ये नवीन संसद भवनाचे महत्व सांगितले. नवीन संसदेमध्ये अशा अनेक गोष्टी असतील ज्यामुळे खासदारांची दक्षता वाढले आणि काम करण्याच्या त्यांच्या शैलीमध्ये आधुनिकता येईल. सध्याच्या संसद भवनाने आपल्याला स्वातंत्र्यानंतर दिशा दाखवण्याचं काम केलं. तर नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीचं साक्षीदार ठरेल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला. जुन्या संसद भवनामध्ये देशासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत गोष्टींसाठी काम करण्यात आलं तर नवीन संसदेमध्ये आता एकविसाव्या शतकातील भारताच्या महत्वकांशा पूर्ण करण्यासंदर्भातील काम होईल, असंही मोदींनी यावेळी म्हटलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी बोलताना जगामध्ये १३ व्या शतकामध्ये मॅग्नाकार्टा यांच्याआधी १२ व्या शतकामध्ये भगवान बसवेश्वर यांनी लोक संसदेची सुरुवात केली होती असंही सांगितलं. दहाव्या शकतामध्ये तामिळनाडूमधील एका गावामध्ये पंचायत व्यवस्था अस्तित्वात होती असे संदर्भ सापडतात. या गावामध्ये आजही तशाच प्रकारची महासभा आयोजित केली जाते. एक हजार वर्षांपासून ही परंपरा तिथे सुरु आहे, असंही मोदींनी सांगितलं. त्यावेळी सुद्धा कोणत्याही प्रतिनिधीने आपल्या संपत्तीची माहिती देण्यास नकार दिला तर तिला आणि तिच्या नातेवाईकांना निवडणूक लढू दिली जात नव्हती, असंही पंतप्रधानांनी सांगितलं.
आपल्या सर्वांना लोकप्रतिनिधी म्हणून हे लक्षात ठेवायला हवं की लोकशाही ही संसद भवनाचा मूळ आधार असून तिच्याबद्दलचा आशावाद आपण कायम ठेवला पाहिजे. हे आपल्या सर्वांच कर्तव्य आहे. संसदेमध्ये पोहचणारा प्रत्येक प्रतिनिधी हा जनतेला उत्तर देण्यास बांधील असतो हे कधीही विसरता कामा नये. ही बांधिलकी जनतेसोबतही आहेत मात्र तितकची संविधानाबद्दलही आहे, असंही मोदी यावेळी म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 10, 2020 3:11 pm